आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात बुद्ध धम्म संघ महोत्सव:गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार केले अर्पण, हजारोच्या उपस्थितीने शहर झाले पंचशील ध्वजमय

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार बळवंतराव वानखडे यांच्या संकल्पनेतून दर्यापूर शहरातील शुभम मंगल कार्यालयात धम्म संघ महोत्सव घेण्यात आला. दर्यापूर-अंजनगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील बुद्ध उपासक-उपासिका यांच्या हजारोंच्या उपस्थितीने शहर पंचशील ध्वजमय झाले होते.

आमदार बळवंत वानखडे यांनी बौद्ध धर्मातील सर्व नागरिकांना एकत्र आणून समाजातील वरिष्ठ पूजनीय बौद्ध भिक्खू यांचे मार्गदर्शन उपासक-उपासिका यांना मिळावे या उद्देशाने या ऐतिहासिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

महोत्सवादरम्यान समता सैनिक दल मानवंदना, पंचशील ग्रहण, वंदनीय भिक्खू संघाचे स्वागत, भोजनदान, बौद्ध उपासक-उपासिका यांचा सत्कार व संघ दान असे कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो (चंद्रपूर) व असंख्य भिक्खू आवर्जून उपस्थित होते. प्रवचन व महिला उपासक संघांना भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व धार्मिक ग्रंथ भेट म्हणून देण्यात आली. प्रारंभी सर्व बौद्ध भिक्खू यांचे लेझीम, वाद्याच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात धम्म ध्वजारोहण तसेच भगवान तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली.

दर्यापुरात "न भूतो न भविष्यती" अशा या बुद्ध धम्म संघ कार्यक्रमाचे आयोजन आमदार बळवंत वानखडे यांनी केल्याबद्दल उपस्थित बौद्ध उपासक व उपसिका यांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी आमदार बळवंत वानखडे मित्र परिवार व बौद्ध मंडळाच्या युवकांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...