आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत बुलडाणा शहराचा 24 धावांनी पराभव; यजमान अमरावती संघाची ‘टी-20’मध्ये हॅटट्रिक

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे तसेच जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अमरावतीच्या यजमानपदाखाली एचव्हीपीएम क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय टी-२० क्रिकेट स्पर्धेत अमरावतीने मंगळवार ५ रोजी झालेल्या सामन्यात बुलडाण्याचा २४ धावांनी दणदणीत पराभव करून विजयाची ‘हॅटट्रिक’ साजरी केली. दुपारच्या सत्रातील लढतीत अमरावती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारित २० षटकांत ८ फलंदाज गमावून १७० धावा उभारल्या. पीयूष खोपेने सर्वाधिक ४२ तर विशेष तिवारीने ४१ धावा करून मोलाचे योगदान दिले. बुलडाणा संघाचे गोलंदाज सुनिकेत बिंगेवार, गोपाल निळे, रोहित तलरेजा या तिघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. १७१ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना बुलढाणा संघाची दमछाक झाली. त्यांना सर्व बाद १४६ धावांपर्यंत मारता आली. यामध्ये सुनिकेत बिंगेवार सर्वाधिक ४२ धावा करू शकला. तर अमरावती संघाला विजय मिळवून देताना अविनाश जाधव आणि विवेक दलवानी यांनी प्रत्येकी ३ फलंदाज बाद केले. दीपेश पारवानीने २ फलंदाज बाद केले. सामन्याचा सामनावीर विवेक दलवानी ठरला.

यवतमाळचा दणदणीत विजय
सकाळच्या सत्रातील लढतीत वाशीमने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला पहिल्या डावात फलंदाजी करताना यवतमाळने २० षटकांत ३ फलंदाज गमावून २०० धावा केल्या. त्यात प्रेरित अग्रवालने नाबाद ९५ धावांची बहारदार खेळी केली. तर हेमंत राठोडने नाबाद ७१ धावा तडकावल्या. वाशीमचा गोलंदाज राहुल यादव याने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात वाशीमच्या सिद्धेश धांडेवारने नाबाद ८४ धावा व शंतनू चिखले याने ४० धावा केल्या. परंतु, वाशीम संघ आपल्या निर्धारित २० षटकांत १८९ धावाच करू शकला अशाप्रकारे यवतमाळ संघाला ११ धावांनी विजय मिळाला. या सामन्यात सामनावीर प्रेरित अग्रवाल याला डॉ. दीनानाथ नवाथे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सकाळच्या सत्रातील सामन्यांमध्ये खेळाडूंचा परिचय करून घेण्यासोबतच शुभेच्छा देण्यासाठी प्रा. किशोर खांडवे, प्रा.संजय मडावी, प्रा. धनंजय विटाळकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...