आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस जवानाचे शहरात घर असून, या जवानाची पत्नी अमरावती शहर पोलिस दलात कार्यरत आहे. दरम्यान त्यांच्या शहरातील खंडेलवाल नगरमधील बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करुन तब्बल १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख २० हजारांची रोख व चांदी असा सुमारे ५ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरी झाल्याचे सोमवारी (दि. ७) दुपारी उघड झाले असून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चोरी प्रकरणी पोलिस जवानाच्या आईने तक्रार दाखल केली आहे. मुंबईत कार्यरत पोलिस जवानाचे नाव योगेंद्र देविदास ओगले आहे. योगेंद्र हे मुंबईत कार्यरत असल्यामुळे त्यांचे आई, वडील, पत्नी व मुलगा खंडेलवाल नगरमध्ये राहतात. ६ नोव्हेंबरला ओगले कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी अकोला येथे गेले होते. दरम्यान, ते ७ नोव्हेंबरला दुपारी घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाच्या कडी कोंडा तुटलेला दिसला. तसेच बेडरुममधील आलमारी व आलमारीचे लॉकर तुटलेले दिसले. चोरट्यांनी ओगले यांच्या घरातून सुमारे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख २० हजारांची रोख व ८ हजारांचे चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१२३ पैकी १०० ग्रॅम दागिने नातेवाइकाचे : ओगले यांच्या घरापासून जवळच त्यांच्या निकटच्या नातेवाईकाचे घर बांधकाम सुरू आहे. दरम्यान, नातेवाइक सध्या बाहेरगावी गेले असल्यामुळे त्यांनी त्यांचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने ओगले यांच्या घरी ठेवले होते. चोरट्यांनी त्याच्यावरही हात साफ केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.