आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव दुचाकीस्वाराची एसटीला धडक:युवक ठार, दर्यापूर-अंजनगाव रोडवरील लेहगाव फाट्याजवळील घटना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामंडळाची बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 1) दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील लेहेगाव (रेल्वे) फाट्यानजीक घडली. प्रशिक संतोष खांडेकर (19) रा. कापुसतळणी असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनेच्या वेळी प्रशिक हा कापूसतळणी येथून आपल्या दुचाकीने (एमएच 30/ एवाय 8704) दर्यापूर मार्गे दताळा ता. मूर्तिजापूर येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान त्याचवेळी दर्यापूरवरून अंजनगावला जाणारी एसटी बस (एमएच 40/ एक्यू 6458) लेहेगाव फाट्यावर थांबली. तेथे बसमधून काही विद्यार्थी व प्रवाशी उतरले. त्यानंतर बस समोर निघाली तोच लेहेगाव फाट्याच्या काही अंतरावर प्रशिक खांडेकर याच्या दुचाकी बसला धडकली. त्यामध्ये प्रशिकच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.

उपचारादरम्यान मृत्यू

यावेळी दर्यापूरवरून अंजनगावकडे जात असलेले माजी मंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी आपली कर थांबून जखमीची तपासणी केली. दरम्यान शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने हेमंत ऊमाळे यांच्या वाहनामध्ये जखमी प्रशिकला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. दर्यापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत अपघाताची नोंद केली आहे.

दोन दुचाकींची धडक

शनिवारी दुसरा अपघात दर्यापूर ते अकोट मार्गावरील सांगळुद फाट्याजवळ घडला. यामध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये निरंजन लक्ष्मण सूर्यवंशी रा. सामदा व अन्य एक जण, असे दोघे गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना अमरावती येथे उपचाराकरिता रेफर करण्यात आलेले आहे. घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलिस करीत आहेत.

सर्वत्र हळहळ व्यक्त

एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. या अपघातांच्या मालिकेमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून युवकाच्या अपघाती मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...