आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरीकरण:अद्वैत नाट्य महोत्सवात ‘बझर’ आज; ‘फारच टोचलंय’चे उद्या सादरीकरण

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अद्वैत संस्थेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘अद्वैत नाट्य महोत्सव’ आयोजित केला आहे. ४ व ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील सिपना इंजिनिअरिंग कॉलेजमधील स्व. अरविंदजी ऊर्फ भाऊ लिमये सभागृहात दोन नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेले धनंजय सरदेशपांडे लिखित, व्यक्ती, पुणे निर्मित एकल नाट्य ‘फारच टोचलंय’ हे या महोत्सवातील विशेष आकर्षण आहे. धनंजय सरदेशपांडे यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे. एकल नाटक हा नाटकाचा प्रकार सध्या आपल्यासाठी नवीन असला तरी तो रसिकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल.

या नाटकाचे दिग्दर्शन रूपाली गोडंबे यांनी केले असून, यातील पार्श्वमंचीय कलावंत राम सैदपुरे, कृतार्थ शेवगावकर व किरण कांबळे हे आहेत. याच नाट्य महोत्सवात दुसरे नाटक चैतन्य सरदेशपांडे यांनी लिहिले आहे. चैतन्य यांनी सध्याची राजकीय परिस्थिती व मध्यम माणूस यांचा संघर्ष दोन अंकी प्रायोगिक हिंदी नाटक ‘बझर’ यातून दाखवला आहे. या नाटकाचे दिग्दर्शन विदर्भाला परिचित असलेल्या नाट्यकलावंत, कवयित्री तसेच बालरंगभूमी परिषद, अमरावती जिल्ह्याच्या अध्यक्ष स्वाती विशाल तराळ यांनी केले.

मराठी राज्य नाट्य स्पर्धेतील मराठी प्रयोगानंतर आता या नाटकाचा प्रयोग हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत होणार आहे. यातील रंगमंचावर प्रमुख भूमिकेत असलेले कलावंत सौरभ काळबांडे, अभिजित देशमुख, विशाल तराळ आणि अंजली टाले आहेत. तर पार्श्वमंचीय कलावंत मनीष प्रजापती, अनुराग वानखडे, तृप्ती मेश्राम, स्वेहा तराळ, अमित आठवले, कीर्ती देशमुख, विलास पकडे हे आहेत.

अद्वैत नाट्य महोत्सवात ४ मे रोजी दोन अंकी प्रायोगिक हिंदी नाटक ‘बझर’ व ५ मे रोजी एकल मराठी नाट्य ‘फारच टोचलंय’ सादर होणार आहे. या नाट्य महोत्सवाचा आनंद अमरावतीकर रसिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक तृप्ती मेश्राम, कीर्ती देशमुख, विशाल तराळ तसेच विलास पकडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...