आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:महिला आरक्षणाने धक्का बसलेल्या उमेदवारांना आता मिळाला दिलासा

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन सदस्यीय प्रभाग रचना तसेच सर्वोच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षणाला मजुरी दिल्यानंतर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या महिला आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांपुढे पेच निर्माण झाला होता. एवढेच नव्हे तर आता काय करायचे अशा गहन विचारासह ते चिंताग्रस्त होते. परंतु, बुधवार ३ ऑगस्ट हा दिवस शहरातील माजी प्रस्थापित नगरसेवक,पदाधिकाऱ्यांसह इच्छूक उमेदवारांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाने तीन सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून २०१७ च्याच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार मनपा निवडणूक होणार असल्याची घोषणा केली. यामुळे अशा सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे.

आरक्षण ठरले, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीही घोषित झाली. त्यामुळे केवळ राज्य सरकार निवडणुकीच्या तारखेची घोषणा केव्हा करणार याचीच सर्वसामान्यांना उत्सुकता होती. तर तिकडे आरक्षणामुळे नुकसान झालेल्यांच्या मनात चलबिचल सुरू होती. बहुतेक प्रभागात दोन महिला अशी स्थिती असल्यामुळे पुरुष उमेदवारांनी नेमके करायचे काय? असा प्रश्न होता. एकतर जम असलेला प्रभाग सोडून दुसरीकडून निवडणूक लढवायची किंवा महिला आरक्षणानुसार घरातील महिलेला उभे करायचे असे विचार सुरू होते. परंतु, एका दणक्यात सर्व विचार थांबले असून नव्या उमेदीने मरगळ झटकून माजी नगरसेवक, पदाधिकारी, इच्छूक उमेदवार कामाला लागले आहेत.

आता यात कोणताही बदल होणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण सततच्या या बदलाचा सर्वसामान्यांवरही विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच तीन सदस्यीय प्रभाग पद्धती ही बहुतेक पक्षांसाठी किचकट होती. परंतु, दोन पुरुष व दोन महिला उमेदवार ही पद्धती सोपी व सुटसुटीत असल्यामुळे अनेकांना हीच पद्धत योग्य वाटत आहे.

तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीची घोषणा झाल्यापासून अनेकांचे चेहरे उतरले होते. मात्र पुन्हा एकदा त्यावर चमक आली आहे. इच्छूक, माजी नगरसेवकांपासून माजी पदाधिकाऱ्यांनी ते प्रांजळपणे मान्यही केले. कारण यामुळे पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. नागरिक जो काही कौल देतील तो देतील. परंतु, आपल्याच प्रभागातून आपल्याला उभे राहता आले, याचे समाधान तर मनात राहील, अशा प्रतिक्रिया या दिलासा मिळालेल्या माजी नगरसेवकांनी व्यक्त केल्या.

अरे याचे कसे होणार, अशा नजराही बदलल्या
तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीसह महिला आरक्षणामुळे माजी प्रस्थापितांना संधी मिळणार नसल्यामुळे अनेकजण अरे याचे कसे होणार? अशा नजरेने बघायला लागले होते. परंतु, आता त्यांच्याच नजराही बदलल्या आहेत. भविष्यात आणखी नव्या उमेदीने काम करता येईल. जी कामे केली, त्याचा किमान यंदाच्या निवडणुकीत लाभ पदरी पडावा, अशी अपेक्षा असलेल्यांचा भ्रमनिरास चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे होता होता राहिला.

बातम्या आणखी आहेत...