आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जात वैधता प्रमाणपत्र आता महाविद्यालयातच

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र आता थेट कनिष्ठ महाविद्यालयात वाटप करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने “मंडणगड पॅटर्न” या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाविद्यालय स्तरावर शिबिर घेऊन त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून राज्यभर “मंडणगड पॅटर्न” राबवण्यात येत आहे. याअंतर्गत अकरावी व बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत व सहज मिळणार आहे.

अमरावती जिल्ह्यात उपायुक्त तथा जात पडताळणी समिती सदस्य जया राऊत यांच्या मार्गदर्शनात समतादूतांच्या मदतीने मंडणगड पॅटर्नची अंमलबजावणी सुरू केली असून, त्यासाठी तालुकानिहाय समता दूतांमार्फत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये जात पडताळणीत लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, शंकांचे निराकरण आदी उपक्रम राबवण्यात येत आहे. समिती थेट महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी करून त्याच ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र वितरित करत आहे.

या शिबिरामध्ये समितीद्वारे अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जाती व विशेष मागासवर्गीय जाती या प्रवर्गांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी तालुकानिहाय कार्यक्रम घोषित करण्यात आला. जातवैधता प्रमाणपत्र समितीने तालुकानिहाय समता दूतांना कामाची जबाबदारी सोपवली आहे. २६ नोव्हेंबरपासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून, प्रत्येक विज्ञान महाविद्यालयात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उपायुक्त तथा जात पडताळणी समितीच्या सदस्या जया राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

आतापर्यंत या महाविद्यालयात वितरण
शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, व्हीएमव्ही महाविद्यालय, मालू इंटरनॅशनल, नरसम्मा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, शिवाजी बहुद्देशीय कनिष्ठ महाविद्यालय, श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र कार्यशाळा राबवण्यात आल्या. त्याअंतर्गत याच ठिकाणी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...