आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळात कारकीर्द घडविण्याची नामी संधी:उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल; हाॅकीसह 16 स्पर्धांद्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या खेळांमध्ये देश प्रगती करीत असून क्रीडा क्षेत्रात नैपूण्य मिळविणाऱ्या तरुणांना करिअर घडविण्यासाठी अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राकडे वळविण्याची गरज असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलातील जिल्हा स्टेडियमवर आयोजित समारंभात व्यक्त केले.

शहरातील विविध मैदानांवर १६ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने खेळाडूंना सराव मिळाला. हाॅकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन अर्थात क्रीडा दिनानिमित्त हॉकी सामना व कार्यक्रमाचे आयोजन पं. जवाहरलाल नेहरु विभागीय क्रीडा संकुलात सोमवार २९ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त विक्रम साळी, क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, पोलीस निरीक्षक राहुल आठवले, इरफान अथर अली, सलीम मिरावाले, मनिष शिरसाठ, शेख इमाम, अविनाश वैद्य, प्रमोद चांदुरकर, संतोष विघ्ने, वैशाली इंगळे, संजय मनवर, संजय कथळकर, अकील शेख, गणेश तांबे उपस्थित होते.

अमरावती विभागीय स्तरावर उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साळी यांनी केले. अमरावतीच्या क्रीडा वैभवाचा वारसा अधिक उज्ज्वल करण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा, असे संतान म्हणाले.

यावेळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या हॉकी सामन्याचे आयोजन करण्यात आले. व ऑलिम्पिकच्या धर्तीवर खेळाडूंनी स्टिक उंचावून फुलांचा वर्षाव करत मान्यवरांना अभिवादन केले. जिल्हा हॉकी असोसिएशनचे सचिव व माजी हॉकी खेळाडू शेख इमाम यांना मेजर ध्यानचंद यांचे छायाचित्र, शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी साळवी यांनी प्रास्ताविक केले. संदिप इंगोले यांनी आभार मानले. यावेळी विविध क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...