आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:कर्नाटक येथील विजयाचा ग्रामीण काँग्रेसतर्फे अचलपुरात जल्लोष फटाक्यांची आतीषबाजी, हा तर जनशक्तीचा विजय - बबलू देशमुख

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत 134 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे अचलपुर येथे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिशबाजीही करण्यात आली.दरम्यान काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मते हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा व लोकशाहीचा विजय आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी सकाळपासून घोषित झाले. तेथील 224 जागांपैकी 134 हुन अधिक जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे. खऱ्या अर्थाने हे यश म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ व ‘हात से हात जोडो’ अभियानाचे फलित आहे. भाजपने अलिकडेच त्यांची खासदारकी रद्द केली. त्याचेही फळ यानिमित्ताने भाजपला मिळाले, असे काँग्रेसजनांचे म्हणणे आहे. भाजपने लोकशाहीलादेखील पायदळी तुडवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळेच भाजपला खतपाणी न घालता खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वावर तेथील मतदारांनी विश्वास ठेवला, अशी भूमिका जल्लोषादरम्यान मांडली गेली. दरम्यान येत्या काळात काळात संपूर्ण देशावर काँग्रेसचे राज्य राहील, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशाच्या निनादात विजयाचा जल्लोष केला गेला.

हा तर मोदींचा पराभव

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कर्नाटकने भाजपचा बुरखा फाडलाय. ध्रुवीकरणाचं राजकारण फार काळ टिकत नाही. हा मोदींचा पराभव आहे. जिंकले तर मोदी आणि हरले तर नड्डा हा बचाव कामाचा नाही. हा पूर्णतः मोदी आणि त्यांच्या विषारी राजकारणाचा पराभव आहे. या देशाचे प्रश्न महागाई, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था हे आहेत. हिंदू-मुसलमान वाद नाही. ही द्वेषाची प्रयोगशाळा उध्वस्त झाली. आता एकच नारा ‘अब महाराष्ट्र की बारी है, काँग्रेस आ रही है’. जे प्रदेश भाजपने खोटेपणाने लुबाडले आहेत तिथेही आम्ही विजय खेचून आणू.