आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VMV महाविद्यालयाची शतकपूर्ती:स्थापना दिनानिमित्त बोधीवृक्षाचे रोपण, शिक्षक-संचालकांकडून 99 वा वर्धापन दिन साजरा

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. दरम्यान येत्या सप्टेंबरमध्ये शताब्दी वर्षात पदार्पणाचा मुख्य सोहळा आयोजित केला जाणार असून वर्षभर विद्यार्थीकेंद्रीत विविध कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संचालक डॉ. अंजली देशमुख यांच्याशिवाय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, शतक महोत्सव समितीच्या प्रमुख डॉ. साधना कोल्हेकर, जेष्ठ प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण यावले, प्रमुख वक्ते डॉ. श्रीनिवास सातभाई, डॉ. किशोर पाटील, डॉ. सतीश माळोदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

99 वर्षांची वाटचाल पूर्ण

विदर्भात शिक्षणाची गंगोत्री आणणाऱ्या व ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या व्हीएमव्हीची इमारत केवळ ऐतिहासिकच नाही, तर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या इमारतीने 99 वर्षांची वाटचाल पूर्ण करुन शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याची आठवण म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात २८ जुलै १९२३ रोजी महाविद्यालय सुरु झाले होते. त्या ऐतिहासिक क्षणाला अविस्मरणीय बनविण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. शतकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

महाविद्यालयाचा आढावा

सन 1923 सालच्या किंग एडवर्ड (पहिले नाव) या महाविद्यालयाची स्थापना होण्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी यासंदर्भात संस्थेच्या आद्यप्रवर्तक यांच्यासह अनेक मान्यवरांचे योगदान तसेच संस्थेच्या प्रारंभ दिनापासून ते सद्यस्थिती पर्यंतचे संस्थेतील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचा आढावा संस्थेतील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. श्रीनिवास सातभाई यांनी विनोदी शैलीमध्ये मांडला.

तसेच आत्तापर्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व प्राचार्य, संचालक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याप्रती आपण कृतज्ञ असले पाहिजे, असे सांगून त्यांना अभिवादन करून आपल्या पुढील वाटचालीची सुरुवात करूया, असा विचार डॉ. अंजली देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतातून मांडले.

केक कापून आनंद साजरा

कोल्हेकर यांनी प्रास्ताविकामध्ये संख्याशास्त्रीय दृष्टिकोनात तत्कालीन महाविद्यालय ते आजच्या स्वायत्त संस्थेतील विद्यार्थीसंख्येचा लेखाजोखा सादर केला. तसेच यानिमित्ताने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे सुतोवाच केले. कार्यक्रमाचा प्रारंभ माता सरस्वती, जिजामाता व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाला. त्यानंतर संस्थेचा लोगो तसेच शंभर हे सांकेतिक चिन्ह साकारलेला केक कापून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...