आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्काजाम आंदोलन:अंजनसिंगीत चक्काजाम आंदोलन, आंदोलक स्वत: पोलिसांच्या स्वाधीन ; मध्यस्थीनंतर आंदोलकांची माघार

धामणगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी, शेतमजूर, वृद्ध पेन्शन धारक व नागरिकांच्या दहा मागण्या घेऊन सोमवारी वृद्ध पेन्शनधारक निराधार संघटना जिल्हाध्यक्ष अशोक काळे यांच्या नेतृत्वात अंजनसिंगी बस स्थानकासमोर ज्येष्ठ नागरिकांसमवेत चक्का जाम आंदोलन करण्यात अाले. या वेळी परिसरातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, श्रावणबाळ योजनेच्या ज्येष्ठ नागरिक व विधवा पेन्शनधारक लाभार्थी सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत प्रश्नात वाढ झाली आहे. आंदोलन करूनही अधिकारी वर्गातून खोटी आश्वासने दिली जात आहे. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अशोक काळे यांनी केला. अंजनसिंगी गावातील मध्यभागातून जाणाऱ्या महामार्गाचे बांधकाम व डिव्हायडर, पीएम किसान योजनेचे अनुदान, वृद्ध पेन्शन धारकांचे थकबाकी व अनुदानात दुप्पट वाढ, पेन्शन धारकांच्या पात्रतेच्या वयोमर्यादा, विधवा, अपंग पेन्शन धारकांच्या जाचक अटी व अनुदान, पाणंद रस्ते, शेतकऱ्यांचे अनुदान, घरगुती गॅस, अंबिका पतसंस्था येथील ठेवीदारांच्या समस्या, गावठाणवरील जागेचे नियमानुकूल आदी समस्यांना घेऊन अशोक काळे यांनी सोमवारी सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलनाला सुरवात केली. दरम्यान तहसीलदार प्रदीप शेलार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मात्र तोडगा निघाला नाही. पर्याय निघत नसल्याने रस्त्यावर बसलेल्या वृद्ध, अपंग, विधवा व ज्येष्ठ आंदोलकांच्या भावना दुखावल्या. अखेर मागण्या पूर्ण होत नसतील तर आम्हाला अटक तरी करावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. तसेच स्वतःला कुऱ्हा पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी वातावरण चांगलेच तापले होते. अखेर पोलिसांनी आंदोलकांना कुऱ्हा पोलिस ठाण्यात आणले. उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मध्यस्थीने महसूल विभागाने दिलेल्या आश्वासनावर अखेर वृद्ध पेन्शनधारक निराधार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे यांनी कार्यकर्त्यांसह आपले आंदोलन मागे घेतले. या वेळी शुभम ठाकरे, चंदन माकोडे, महेंद्र काळे, गणेश पिल्हारे, राइसखाँ पठाण, संजय घावट, आबीद शाह, विलास माकोडे, पंजाब कटाने, दादाराव गडलिंग, विष्णुपंत बुराडे, प्रल्हादराव शेंडे, कुणाल भोंगाडे, कौशल्या वाघमारे, यमुना निमकर, भुरु मुळे, शांता मोकासे, बेबी काळे. सुनंदा मालखेडे, शांता मोकलकर, चंदा झाडे उपस्थित होते. या वेळी ठाणेदार संदीप बिरांजे व विभागाचे १५ पुरुष आणि ५ महिला पोलिस कर्मचारी बंदोबस्तात होते.

न्याय्य हक्कासाठी लढा ^न्याय्य-हक्कासाठी रीतसर रास्ता रोको आंदोलन केले. १० दिवसात आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तहसीलदार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू. याची संपूर्ण जवाबदारी प्रशासनाची राहील. - अशोक काळे, जिल्हाअध्यक्ष, पेन्शनधारक निराधार संघटना

बातम्या आणखी आहेत...