आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य यांचा निकटचा संबंध आहे. आपल्या भागातील नद्या जिवंत व प्रवाही राहाव्यात, त्यावर आधारित शेती व उद्योगव्यवसाय अधिक वृद्धींगत व्हावे, यासाठी शासनाने ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज, सोमवारी येथे केले.
‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी पिंगळाई, खोलाड आणि चंद्रभागा या तीन नद्यांची निवड झाल्याचा मुद्दा सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने वाचकांपुढे मांडला होता, हे विशेष.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दुपारी कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, अभियानाचे सदस्य सचिव, उपवन विभागीय अधिकारी लीना आदे, जलसंपदा खात्याच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सचिन देशमुख तसेच समितीतील अशासकीय सदस्य गजानन काळे, अरविंद नळकांडे, अॅड. राजीव अंबापुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील ७५ नद्या पुर्नजीवित करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. जनसामान्यांना नदी साक्षर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजलस्तर उंचावण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात खारपाण पट्ट्यातील अमरावती जिल्ह्यातील तीन नद्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोर्शी-तिवसा तालुक्यातील पिंगळाई, चांदूररेल्वे तालुक्यातील खोलाड व अचलपूर-दर्यापूर तालुक्यातील चंद्रभागा नदीचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षात पर्जन्याच्या विचलनामुळे कधी पूर तर कधी दुष्काळ अशा समस्या निर्माण होत आहे. यामुळे शेती उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. वाढते नागरिकरण आणि औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढत आहे. शिवाय नद्या, जलाशयांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता आणि साठवणूक क्षमता कमी झाली आहे. या बाबींचा विचार करता नदींना जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम-वर्धा येथून झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.