आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समितीच्या तोतया कर्मचाऱ्यास अटक:शेळीपालनाचे 95 हजार रुपये अनुदान मंजूर झाल्याची थाप, चांदुर रेल्वे येथील घटना

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेळीपालनाकरिता ९५ हजाराचे अनुदान मंजूर झाल्याचे आमीष दाखवून धनोडी येथील एका व्यक्तीस दहा हजार रुपयांनी लुबाडल्याची घटना घडली. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. रामराव भीमराव ढोबळे (५०, राहणार अशोकनगर तिवसा) असे अटक केलेल्या आरोपीचे तर धनोडी येथील केसरबाई राजकुमार चतुर (रा. धनोडी) असे तक्रारदाराचे नाव आहे.

चतुर कुटुंबातील केसरबाई चतुर व त्यांची सून घरी असताना दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. आम्ही चांदुर रेल्वे पंचायत समिती कार्यालयात नोकरीवर असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगत असतानाच पशुपालन योजनेअंतर्गत शासनाकडून तुम्हाला (केसरबाई चतुर यांना) ९५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहितीही त्यांना दिली. सदर अनुदान प्राप्त करुन घेण्यासाठी त्या अनो‌ळखी इसमांनी केसरबाई यांना आधार कार्ड, राशन कार्ड, दोन पासपोर्ट फोटोंची मागणी केली तसेच स्वहिस्सा म्हणून आधी १० हजार रुपये भरावे लागतील, असेही सांगितले.

९५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने केसरबाई चतुर यांनी लगेच त्यांना कागदपत्रे व रक्कम दिली. ही रक्कम घेतल्यानंतर दोन्ही भामट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान केसरबाई यांनी या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी पंचायत समिती गाठली. त्यावेळी त्यांना ते कर्मचारी तेथे दिसून आले नाही. शिवाय अशाप्रकारचे कोणतेही अनुदान मंजूर झाले नसल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांद्वारे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे क‌ळताच चतुर कुटुंबियांनी तळेगाव दशासर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी रामराव ढोबळे यास अटक केली.

त्याच्या ताब्यातून दहा हजार रुपये व दुचाकी जप्त करण्यात आली. अन्य दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल मिश्रा, पोलीस जमादाप गजेंद्र ठाकरे, शिपाई मनीष कांबळे गौतम गव्हा‌ळे व महिला पोलीस शिपाई भाग्यश्री काळमेघ करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...