आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:साडीचे छत, ब्लँकेटची भिंत... दिवसा निवारा आणि रात्री पांघरूण, छत्तीसगडच्या कामगारांचा जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष

अमरावती / अनुप गाडगे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोबाइल चार्जिंगसाठी दररोज द्यावे लागतात दहा रुपये

छत्तीसगडची पंचवीस-तीस कुटुंबे वीस वर्षांपासून अमरावतीत येतात. काही महिने काम करून परततात.या वर्षी लॉकडाऊनमुळे ते अडकले. गावाला जायला परवानगी आहे, पण पैसा नाही, तिकडे लोक येऊ द्यायला तयार नाहीत. त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

झाडू तयार करायचे, ते विकायचे आणि वर्षभराची कमाई करून पुन्हा गावी परतायचे. गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा परिपाठ. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे त्यात खंड पडला...अमरावतीत अडकलेल्या जानकीबाई सिसोदिया सांगत होत्या. शहरातील भानखेडा मार्गावरील खुल्या मैदानात उभारलेल्या तात्पुरत्या झोपडीत त्या सध्या राहाताहेत. जानकीबाईंनी आज पन्नाशी गाठलीय. वयाच्या तिशीपासून त्या अमरावतीत येतात. चिरे जमवतात, ते वाळवतात, त्यापासून झाडू तयार करतात आणि त्याची विक्री करून गावाकडे परत जातात. यंदा मात्र कोरोनामुळे इथेही कामधंदा नाही आणि गावाकडेही आसरा नाही या कात्रीत त्या सापडल्या आहेत. गेल्या चार महिन्यांत परिस्थिती एवढी खालावलीय की छतावरच्या ताडपत्रीलाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. अंगावरच्या साडीचंच त्यांनी छत केलंय, ब्लँकेटच्या भिंती आणि रात्री थंडी वाजली की त्याचंच पांघरूण अशी त्यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे.

मोबाइल चार्जिंगसाठी दररोज द्यावे लागतात दहा रुपये

या लोकांच्या झोपडीमध्ये किंवा आजूबाजूलाही वीज नाही. प्रत्येकाकडे मोबाइल आहे, पण चार्जिंगची सोय नाही. अशा वेळी त्यांना शहरातील दुकानदारांकडून दररोज १० रुपये देऊन मोबाइल चार्ज करून घ्यावा लागतो. सध्या तर खाण्याचे हाल असल्याने चार्जिंगसाठी पैसे देणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे सुरेंद्र सिसोदियासारख्या वस्तीतील युवकांकडे मोबाइल दिसतात, पण पूर्णपणे डिस्चार्ज झालेले.

काही झालं तरी आमच्या मुलांना शिकवणारच

आम्ही शिकलो नाही त्यामुळे मोलमजुरी करावी लागते. मात्र यंदा कामच नाही त्यामुळे पैसा नाही, पोटभर खायला नाही. पण काहीही झालं तरी मुलांना शिकवणारच. त्यामुळे किमान आम्ही जगतोय असं हलाखीचं जीवन आमची मुलं तरी जगणार नाहीत एवढा ठाम निश्चय केल्याचं या लॉकडाऊनच्या अनुभवानंतर या वस्तीतील सिसोदिया कुटुंबातील प्रत्येक महिला सांगत होती.

बातम्या आणखी आहेत...