आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलदरा तालुक्यातील 15 गावात नवीन धान्य दुकाने:संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलदरा तालुक्यातील 15 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने (रेशन दुकाने) सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार इच्छूक संस्था व गटांनी 9 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले आहे. चिखलदरा तालुक्यातील टेटू, मेमना, लवादा, पांढराखडक, मोझरी, रामटेक, बागलिंगा, कुलंगणा बु., चौऱ्यामल, लाखेवाडा, भांडुम, सलिता, सुमिता, खुटिदा, कुही ही ती 15 गावे आहेत.

या गावांतील रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल. शिवाय याच प्राथम्यक्रमाने अर्जाचा विचार होईल. वैयक्तिक अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

अशी आहे निवड प्रक्रिया

इच्छूक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान प्राप्त करुन घेत दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर आहे. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

शिफारशीनंतरच अंतिम निर्णय

रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. स्वयंसहायता गटास परवाना देण्यापूर्वी सदर प्रस्ताव महिला ग्रामसभेकडे पाठविला जाणार आहे. महिला ग्रामसभेच्या शिफारशीनंतरच अंतिम निर्णय होईल. अर्जासोबत संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, तीन वर्षांचे लेखे, हिशोब, कर्ज, परतफेड, बँकेचे व्यवहार आदी सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

नागरिकांना मोठा दिलासा

चिखलदरा तालुक्यात नवी 15 दुकाने सुरू होत असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या या नागरिकांना धान्य मिळविण्यासाठी दूरवर जावे लागते. इतर दुकानांमधून त्यांना धान्य वितरित केले जाते. नवी दुकाने सुरू झाल्यानंतर त्यांचा हा त्रास वाचणार आहे.

बातम्या आणखी आहेत...