आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखला विवाह:हळद लागण्याआधी अल्पवयीनांचा चाइल्डलाइनने रोखला विवाह; नांदगाव खंडेश्वर ठाणे हद्दीतील घटना, 14 वर्षीय दोन्ही अल्पवयीन ताब्यात

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत १४ वर्षीय मुलगा व मुलीचा बालविवाह रोखण्यात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित चाइल्ड लाइनला यश आले.बालविवाह होत असल्याची माहिती १०९८ क्रमांकावर मिळाल्यानंतर. चाइल्डलाइन टीमने या प्रकरणाची शहानिशा केली असता मुलीचे व मुलाचे वय १४ वर्ष असल्याचे समजले. तसेच अल्पवयीन नवरदेव मुलगा हा नात्याने मुलीचा मामेभाऊ असल्याचेही कळाले. मुलीला तिच्या नातेवाइकांनी परतवाडा येथील वसतिगृहातून फूस लावून लग्न करण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर प्रथम चाइल्डलाइन अमरावतीने महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी व पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांना पत्र दिले. चाइल्डलाइन टीमने नांदगाव खंडेश्वर पोलिस पथकासह घटनास्थळ गाठले. त्यावेळी दोन्ही अल्पवयीनांना हळद लावण्याची तयारी सुरू होती. हळद लागण्याआधीच दोघांना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर बालकांच्या पालकांना पोलिस ठाण्यात आणून समज देण्यात आली. मुलगा व मुलगी १८ वर्षांचे झाल्यानंतरच त्यांचा विवाह करू. अल्पवयात बालविवाह करणार नाही, असे पालकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. दोघांच्याही पालकांना बालकल्याण समिती अमरावती यांच्यापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर मुलीला काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने वैद्यकीय तपासणी करून शासकीय मुलींच्या बालगृहात दाखल करण्यात आले. तसेच दोन्ही अल्पवयीन बालकांची देखरेख व काळजी तसेच पुढील मदत व पाठपुरावा चाईल्डलाईन अमरावती करणार आहे.

बालविवाह रोखण्यासाठी एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, सचिव डॉ‌. माधुरी चेंडके यांच्या मार्गदर्शनात चाइल्डलाइनचे संचालक डॉ. नितीन काळे, उपसंचालक प्रा. प्रशांत घुलाक्षे, महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे, बालकल्याण समिती सदस्या अंजली घुलाक्षे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, ग्रामीण महिला सेल प्रमुख बंसा यांनी कारवाई केली. चाइल्डलाइन टीमचे समन्वयक अमित कपूर, समुपदेशक सपना गजभिये, टीम मेंबर मीरा राजगुरे, पंकज शिनगारे, सरिता राऊत, अजय देशमुख, शंकर वाघमारे, ऋषभ मुंदे तसेच नांदगाव खंडेश्वरचे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे, सहकारी प्रफुल्ल शहारे, ममता अंबुलकर व बालगृहाच्या अधीक्षिका यांनी बालविवाह रोखण्यासाठी परिश्रम घेतले.