आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे शुक्रवार,दि. ६ जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त शहरातील चार पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व एक वर्षाचे विमा कवच असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कार योजनेची जिल्हाधिकारी यांनी तोंडभरुन प्रशंसा केली.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रभारी माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, पुरस्कारांचे प्रायोजक ज्येष्ठ पत्रकार अॅड. दिलीप एडतकर, विलास मराठे, अभिराम देशपांडे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी वैभव चिंचाळकर यांना बाळासाहेब व डॉ. अरुण मराठे स्मृती‘प्रभावी’ पत्रकारिता, शंशाक लावरे यांना लक्षवेधी तर महेश कथलकर यांना ममता एडतकर स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता तर गजानन मोहोड यांना अनिल कुचे स्मृती शोध पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी पवनीत कौर यावेळी म्हणाल्या, पत्रकारांवर महत्त्वाची जबाबदारी असून त्यांना नेहमी सामाजिक जाणीवेने काम करत जनजागृती करावी लागते. प्रशासनालाही त्यांच्या माध्यमातूनच कामाची दिशा कळते. पुढे बोलताना विद्यार्थीदशेत वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपणास शिक्षणही मिळाले, याचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.
जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार तसेच महावितरणचे फुलसिंग राठोड, महापालिकेचे भूषण पुसतकर व विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर अशा चार सदस्यीय समितीने पुरस्कारर्थींची निवड केली. यावेळी पवार यांनी पत्रकार निवडीची प्रक्रिया व शुभेच्छापर संबोधन केले. अध्यक्षीय भाषणातून हरणे यांनी पत्रकार संघाच्या एकूण वाटचालीचा आलेख मांडतानाच पत्रकारांच्या समस्यांबाबत प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी दर्पणकारांना पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे सचिव रवींद्र लाखोडे यांनी केले.
पुरस्कार वितरणाबाबतची मांडणी कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर यांनी केली. संचालन कार्यकारिणी सदस्य शैलेश धुंदी यांनी केले. आभार कार्यकारिणी सदस्य कृष्णा लोखंडे यांनी मानले. संघाचे उपाध्यक्ष अमोल इंगोले, कार्यकारिणी सदस्य संतोष तापकिरे, प्रवीण कपिले, प्रदीप भाकरे, संदीप शेंडे, भय्या आवारे यांनी स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.