आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुस्टरडोससाठी अमरावतीकरांची दांडी:रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक बेफिकीर; प्रशासनातर्फे निर्बंधच नसणे हेही एक कारण

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुस्टर डोजसाठी मोजाव्या लागणाऱ्या रकमेत पुर्णत: सूट दिल्यानंतरही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक तिसऱ्या लसीकडे पाठ फिरविली आहे. अमरावती जिल्ह्यात या घडीला 10 लाख नागरिक बुस्टर डोजसाठी पात्र आहेत. परंतु त्यापैकी केवळ 1 लाख नागरिकांनीच हा डोज घेतल्याची आरोग्य विभागाची नोंद आहे. त्यामुळे तब्बल 9 लाख नागरिक अजूनही या डोजपासून दूर आहेत.

साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि फ्रंट लाईन वर्कर्स वगळता इतर सर्वांना या लसीसाठी पूर्वी किमान 400 रुपये मोजावे लागत होते. त्यातही ती लस शहरात केवळ एकाच खासगी डॉक्टरकडे उपलब्ध होती. दरम्यान स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गेल्या 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांसाठी हा डोज विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शासनाच्या त्या घोषणेला 20 दिवसही उलटून गेले. तरीही पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद नाही, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. आरोग्य विभागाच्या मते दरदिवशी किमान सहा हजार नागरिक बुस्टर डोज घेतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी लसीकरणाची दीडशेवर केंद्रे जिल्हाभरात उपलब्ध करुन देण्यात आलीत. पण तरीही नागरिक बुस्टर डोज घ्यायला धजावत नसून, अपेक्षेच्या तुलनेत निम्मेच लोकं बुस्टर डोज घेतात, ही वस्तुस्थिती आहे.

कोरोना प्रतिबंधक दोन लसी घेतल्यामुळे स्वत:मध्ये कोरोनाला पळवून लावण्याइतपत प्रतिबंधक शक्ती निर्माण झाली, असे अनेकांना वाटते. त्यामुळे तिसरा अर्थात बुस्टर डोज कशाला घ्यायचा, असा अनेकांना प्रश्न आहे. कदाचित त्यामुळेही बुस्टर डोजला कमी प्रतिसाद मिळत असावा, असा आरोग्य यंत्रणेसह अनेकांचा कयास आहे. कोरोनाचा कहर जेव्हा जास्त प्रमाणात वाढला होता, त्यावेळी नागरिक स्वत:हून डोज घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करायचे. नंबर लावण्यासाठी दोन-दोन दिवस नागरिकांना तिष्ठत बसावे लागे. परंतु आता अगदी त्याऊलट चित्र आहे.

33 हजार बालकांनी लसच घेतली नाही

तिसऱ्या डोजची स्थिती गंभीर असणे कमी झाले की काय तर जिल्ह्यातील १२ ते १५ वयोगटातील बालकांची स्थिती याहूनही गंभीर आहे. जिल्ह्यात या संवर्गाचे उद्दीष्ट 96 हजार 930 आहे. परंतु यापैकी लसवंत झालेले म्हणजेच पहिला डोज घेणारे 64 हजार 110 बालके आहेत. त्यामुळे 32 हजार 820 बालकांनी अद्यापही लस घेतली नाही.

पालकांनी संमती द्यावी

अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले म्हणाले की, 12 ते 15 वयोगटातील बालकांचा लसीकरणातील टक्का वाढावा, यासाठी शाळानिहाय शिबिरे भरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने यापूर्वीच घेतला आहे. तशी शिबिरेही सुरु आहेत. परंतु बहुतेक पालक संमती देत नसल्यामुळे शिबिरांना प्रतिसाद मिळत नाही, असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...