आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटसाठी आरोग्य विभागाचे ‘स्पेशल मॉडेल’ लवकरच:आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची माहिती, म्हणाले - १५ दिवसांत रिझल्ट देतो

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटातील ढासळलेल्या आरोग्यविषयक स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा परिसर (मेळघाट) यापुढे माझ्या खात्यासाठी नेहमी विशेष बाब असेल. त्यामुळे त्यासाठी ‘स्पेशल मॉडेल’ तयार केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज, शनिवारी सायंकाळी येथे स्पष्ट केले. हे मॉ़डेल येत्या 15 दिवसांत अस्तित्वात येईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. आरोग्य मंत्री झाल्यानंतर डॉ. सावंत यांचा हा पहिलाच अमरावती जिल्हा दौरा होता.

या दोन दिवसीय दौऱ्यात डॉ. सावंत यांनी मेळघाटातील अनेक गावच्या आरोग्य यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी येथे पोचल्यावर विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्याच क्रमात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मेळघाटातील कुपोषण हा 1992 पासून अमरावती जिल्ह्याला लागलेला कलंक आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

मेळघाटातील कुपोषण एवढ्या वर्षात संपले नसले तरी मी तयार केलेल्या मॉडेलनुसार ते लवकरच शून्यावर येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्यामते मेळघाटातील बालमृत्यू हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. त्यामुळे मी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असून आशा वर्कर ते आरोग्य विभागातील सर्वोच्च अधिकारी यांच्याशी बातचित केली आहे. त्यांच्या माध्यमातून मला जे कळले, त्या बाबी आणि माझे व्हिजन मिळून एक स्वतंत्र पॅकेज लवकरच तयार केले जाणार आहे.

या पॅकेजसाठी मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून बऱ्याच बाबींची परवानगी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे येत्या चार-पाच दिवसांत मी या भागातून वेगवेगळे प्रस्तावही मागवले असून ते प्राप्त होताच मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यामुळे माझे मॉडेल काय, हे आत्ताच मला उघड करता येणार नाही. परंतु, येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी हे मॉडेल अस्तित्वात आलेले असेल व त्यातील प्रत्येक मुद्दा तुमच्यापर्यंत पोचलेला असेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यांच्यामते मेळघाटातील प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी आ‌वश्यक त्या सर्व सोयी पुरविल्या जाणार असून त्यासाठीची आखणी करण्यात आली आहे. औषध पुरवठा, कर्मचाऱ्यांची भरती, डॉक्टरांच्या नियुक्त्या, यंत्रसामग्रीची उपलब्धता आदी सर्व बाबींवर मी लक्ष केंद्रीत केले आहे.

पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक घोडके यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीने झळकविली निषेधाची फलके

बैठक सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाची फलके झळकविली. दोन दिवसांपूर्वी झालेली आरोग्य सचिव तुकाराम मुंढे यांची बदली हा त्यांच्या निषेधाचा विषय होता. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करा, त्यांची बदली करण्यामागे काय दडले आहे अशा घोषणा देत थेट मंत्र्यांसमोरच राकाँ कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदविला.

बातम्या आणखी आहेत...