आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानजिकच्या म्हसला येथील प्रगतीशील शेतकरी रवींद्र मेटकर यांच्या अंजनगाव बारी रस्त्यावरील मातोश्री फार्मला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी चक्क त्यांनी मिनी ट्रॅक्टर चालवून प्रत्यक्ष नांगरणीचा अनुभव घेतला. दरम्यान शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मेटकर यांच्यासारखेच शेतीपुरक व्यवसाय सुरु करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सन २००८ मध्ये रवींद्र मेटकर यांनी बँक ऑफ इंडिया कडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेत कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायामुळे सध्या ते दररोज ९० हजार अंडी विकतात. आजघडीला त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये स्वयंचलित थ्रीटायर पध्दतीचे आठ शेड आहेत. त्यात दीड लाख पक्षी आहेत. त्यापासून वर्षभरात त्यांना दीड कोटी रुपये उत्पन्न मिळते. दुसरीकडे सात एकर जमीनीत संत्रा, मोसंबी, चिकु, आंबा, पेरु, फणस, विविध मसाले, नारळाचे उत्पन्नही घेतात. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी एकदा त्यांच्या फार्मला भेट देऊन त्यांची प्रयोगशीलता जाणून घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारी सदर फार्मला भेट दिली.
कुक्कुटपालनासाठी कोंबडीच्या जातीची निवड, शेडची रचना, पक्ष्यांची वाढ आणि त्यानुसार व्यवस्थापन, पक्ष्यांचे खाद्य व पाणी व्यवस्थापन, पक्ष्यांसाठी योग्य तापमान व्यवस्थापन व पक्ष्यांच्या खाद्यपदार्थाच्या निर्मितीबाबतची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली. पशुसंवंर्धन उपायुक्त संजय कावरे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, तहसिलदार संतोष काकडे, प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने, पशुधन विकास अधिकारी डॉ. जयंत माहुरे, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी किशोर हातागडे, मंडळ कृषी अधिकारी गीता कवने, घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रश्र डॉ. अतुल कळसकर, विषयतज्ज्ञ डॉ. शरद कठाळे व मेटकर यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
कृषी विभागाला प्रशिक्षणाचे निर्देश
कृषी विभागाने प्रगतीशील शेतकऱ्यांचा गट तयार करुन त्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुक्कूटपालन, पशुपालन आदींबाबत माहिती द्यावी. कृषी क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी जोड व्यवसायाबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असल्याने कृषी विभागाने तसे नियोजन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
हे आहेत मेटकर यांचे पुरस्कार
प्रयोगशील शेतकरी असलेल्या रवींद्र मेटकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आदर्श शेतकरी पुरस्कार, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा नवसंशोधक पुरस्कार, राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांबद्दलही जिल्हाधिकारी कौर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.