आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ सर्वेक्षण:जिल्हाधिकारी पोहोचल्या शेंदुरजनाघाट नगर परिषदेत; विकासकामांची पाहणी

शेंदुरजनाघाट25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवार, दि. १ नोव्हेंबरला येथील नगर परिषद कार्यालयाला भेट देऊन शहरामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा-तीन आदी उपक्रमासंदर्भात त्यांनी चर्चा केली तसेच इतर विकास कामांचा विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.

जी विकासकामे वेगवेगळ्या कारणांनी अडली आहेत, त्यासंदर्भात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आवश्यक त्या सूचनासुद्धा केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयातील स्वच्छता विभागात कार्यरत महिला कर्मचारी यांचे चांगल्या कामगिरीसाठी प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी यांनी इतर विषयांचाही आढावा घेतला. पाहणी दौऱ्याचा आरंभ करताना त्यांनी सर्वप्रथम घनकचरा व्यवस्थापन केंद्राची निवड केली. तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांकडून केंद्रावरील सर्व प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन केंद्रात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद शाळा क्रमांक दोनची पाहणी करून शिक्षकांशी चर्चा केली. शिवाय शाळेविषयी मुद्देही जाणून घेतले.

पुढच्या टप्प्यात नगर परिषद शेंदुरजनाघाट येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यान तसेच हिंदू स्मशानभूमी स्थळांना भेट देऊन पाहणी केली. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांच्याबरोबर मुख्याधिकारी रवींद्र पाटील, उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, नगरपालिका प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता वंजारी, शेंदूरजनाघाटचे आरोग्य निरीक्षक रणजित सोनेकर, शहर समन्वयक विक्रम खोडके, दीपक दंवडे, कार्तिक होले, कुणाल आठवले व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी त्यांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त करत जिल्हाधिकारी कौर यांचे नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी तथा प्रशासक रवींद्र पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...