आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ते ठाकले:आ. भुयार केंद्रावर आल्याने उडाला गोंधळ; मतदान प्रक्रियेला गालबोट ; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. ११) सकाळपासून अमरावतीत मतदानाला सुरुवात झाली. मतदान सुरू असतानाच एका मतदान केंद्रात वरुड -मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार आतमध्ये गेले. त्यावरून विकास पॅनलच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळ उडाला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. तसेच अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वांना शांत राहण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र काही वेळासाठी या प्रकाराने मतदान प्रक्रियेला गालबोट लागले.

श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू झाली होती. मतदान केंद्रावर एकूण पाच वर्ग खोल्यांमध्ये मतदान होते. पाच पैकी खोली क्रमांक पाचमध्ये मतदानासाठी येणारे बहुतांश मतदार हे ज्येष्ठ व वृद्ध असल्यामुळे त्यांच्यासोबत मतदानासाठी त्यांचा प्रतिनिधी मतदानाला येत होता. यामुळे दोन्ही पॅनलचे या खोलीवर विशेष लक्ष हाेते. दरम्यान, दुपारी बारा वाजेच्या सुमारास आमदार देवेंद्र भुयार हे पाच क्रमांकाच्या खोलीत पोहोचले.त्यावेळी विकास पॅनलच्या प्रतिनिधींनी आमदार देवेंद्र भुयार आतमध्ये कसे आले, हे मतदार नाहीत. असा आक्षेप घेतला. त्यावेळी प्रगती पॅनलचा एक उमेदवार आणि विकास पॅनलचा एक उमेदवार त्यांच्यात मतदान केंद्रांवरच जोरदार बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचा आवाज खोलीबाहेर असलेल्या दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांच्या कानावर पडली. त्यामुळे दोन्ही पॅनलचे समर्थक कार्यकर्ते एकमेकांसोबत वाद घालायला लागले. मतदान केंद्राच्या खोलीत सुरू असलेला वाद मैदानावर आला. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. त्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेऊन वाहनातही बसवले होते. त्यानंतर मात्र परिस्थिती शांत झाली होती. यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता. या प्रकारानंतर अध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार, इतर पदांसाठी निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार, आ. पंकज भोयर आदी मंडळी पोलिसांसोबत चर्चा करण्यासाठी मैदानात आल्याचे दिसत हाेते. त्यामुळे या वादावर एकदाच पडदा पडला आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

बातम्या आणखी आहेत...