आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठा फायदा; बार्टीतर्फे सामाजिक न्यायभवनात लवकरच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सामाजिक न्यायभवन - Divya Marathi
सामाजिक न्यायभवन

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथील सामाजिक न्याय भवनात लवकरच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून बार्टीच्या माध्यमातून हा निर्णय लवकरच अंमलात येईल, असे प्रादेशिक उपसंचालक सुनील वारे यांनी स्पष्ट केले.

राज्यात प्रथमच एखाद्या विभागाच्यावतीने जिल्हास्तरावर स्वतंत्र स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहे. देश व राज्याच्या प्रशासनात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे आणि त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाने हे पाऊल उचलले असून अमरावतीशिवाय इतर ठिकाणीही अशीच केंद्रे सुरु केली जाणार आहेत.

या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक न्याय भवनात सुरु होणाऱ्या या स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे युपीएससीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील विद्यापीठांशी करार करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर जगभरातील विषय तज्ञ, परदेशातील विद्यापीठांमधील व्याख्याते यांचेही मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

या केंद्रांमधून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा यात प्रामुख्याने राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांविषयी उत्तमात उत्तम दर्जा राखून ज्ञान कसे देता येईल, यावर भर टाकला जाईल. त्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दिनेश डिंगळे यांच्यासह नियामक मंडळ सदस्य तयारीला लागले असल्याचेही प्रादेशिक उपायुक्तांनी स्पष्ट केले.

..म्हणून हा घेतला निर्णय

सध्या बार्टीमार्फत काही जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र ही खाजगी संस्थांकडून अनुदान तत्वावर चालविली जातात. परंतु ठराविक संस्थाच ही स्पर्धा परीक्षा केंद्र चालवित असून यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य घडण्याऐवजी त्या संस्थाच अधिक गब्बर होत आहेत. सामाजिक न्याय विभागाकडे त्या संस्था सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघत आहेत. परिणामी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकाल नगण्य आहेत. त्यामुळे तेथेही सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीमध्ये स्वतंत्रपणे स्पर्धा परीक्षा केंद्र चालविले जाणार आहे.