आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलजीवन मिशनअंतर्गत खेडोपाडी पाणी पुरवठा योजनांची अनेक कामे प्रस्तावित आहेत. ती तत्काळ पूर्ण करावी. मेळघाटात पाणीपुरवठा योजनांची गरज पाहता ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश खा. नवनीत राणा शुक्रवार १० रोजी दिशा समितीच्या बैठकीत दिले. नियोजन भवनात दिशा समितीची बैठक खा. राणा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गावोगावी नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी जलजीवन मिशनमधील कामे पूर्ण करावी. आवास योजनेमुळे गरीबांचे घरांचे स्वप्न साकार होते. त्यानुसार सर्वांसाठी घरे योजनेत ठिकठिकाणी कामे सुरू करण्यात आली. मात्र, गत वर्षात त्यांची गती मंदावल्याचे दिसते. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या कामांना वेग द्यावा. शाळांच्या नादुरुस्त इमारती तात्काळ दुरुस्त करुन घ्याव्यात, असे निर्देश खा. राणा यांनी दिले. मनरेगा योजनेतून मेळघाटात, तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते, बंधारे, जलसंवर्धन, गुरांचे गोठे, वृक्षारोपण अशी अनेक कामे केली जातात.
मनरेगाद्वारे रोजगार निर्मितीबरोबरच कायमस्वरुपी पायाभूत सुविधा निर्माण होत असल्यामुळे त्यांचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे, असे निर्देश खासदार डॉ. बोंडे यांनी दिले. ग्रामीण रस्त्यांची निर्मिती केल्यानंतर काही वर्षातच ते नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे आवश्यक तिथे रस्त्यांची दुरुस्ती वेळोवेळी करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले. बैठकीत ग्रामीण कौशल्य योजना, स्वच्छ भारत अभियान, ग्रामीण ज्योती योजना, अंत्योदय योजना, पीक विमा योजना, आरोग्य अभियान, कौशल्य विकास योजना आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.