आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी बेनोडा येथील युवकाचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. १३) मृत्यू झाला. त्याची बुधवारी बेनोडा परिसरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. परंतु, राजापेठ पोलिस ठाण्यासमोरून अंत्ययात्रा हिंदू स्मशानभूमीकडे दुपारी २ वाजताच्या सुमारास जात असताना तणाव निर्माण झाला.
काही पुरुष व महिला राजापेठ ठाण्यात बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांना न जुमानता त्यांनी नंतर तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे राजापेठ पोलिस ठाणे परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गाेंधळ घालणाऱ्या जमाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. याच कालावधीत अत्ययात्रेदरम्यान यशोदानगर ते मोतीनगर मार्गावरही तणावाची स्थिती होती.
बेनोडा येथील रहिवासी रोहीत उर्फ नादो भोंगाडेवर ९ डिसेंबरच्या रात्री चार जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्याचा १३ रोजी दुपारी मृत्यू झाला. मृताच्या बहिणीवर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी रोहीतची बेनोडा परिसरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंत्ययात्रा यशोदा नगर परिसरातून मोती नगर मार्गे जात असतांना या परिसरात तणावाची परिस्थिती दिसून आली. मोती नगर परिसरातील काही व्यावसायिकांनी त्यांची दुकाने बंद केल्याची माहितीही पुढे आली आहे. तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.
रोहीतवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी राजापेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहेत. त्यामुळे अंत्य यात्रेतील संतप्त पुरुष व महिला ठाण्यात बळजबरीने शिरत असतांना पोलिसांनी त्यांना दाराजवळ अडविले.यावेळी पोलीस व क्यूआरटी पथकाने सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेनंतर स्मशान भूमी येथे देखील दंगा नियंत्रण पथक तैनात केले होते.
पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ५ ते ६ महिला-पुरुषांनी आक्रमकपणे ठाण्याच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही. अखेर सौम्य बळाचा वापर करावा लागला. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.-मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.