आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन:महामानवाच्या अस्थिकलश दर्शनासाठी काँग्रेसने काढली अभिवादन पदयात्रा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नया अकोला येथे स्थापित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी मंगळवारी माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते १८ कि.मी. अंतर पायी चालून नया अकोला येथे पोहोचले. तेथे महामानवाच्या अस्थिकलशाचे दर्शन करून अनुयायांना संबोधित केले. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथून या अभिवादन पायदळ यात्रेला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. दुपारी ११.३० वाजता ही यात्रा नया अकोला येथे दाखल झाली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश अमरावती तालुक्यातील नया अकोला येथे पंजाबराव खोब्रागडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ६६ वर्षांपूर्वी ९ डिसेंबर १९५६ रोजी स्थापित करून तेथे अस्थी स्मारक निर्माण केले. याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने अमरावती शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन पदयात्रा काढण्यात आली. माजीमंत्री अॅड. ठाकूर, जिल्हाध्यक्ष देशमुख, आ. बळवंत वानखडे, माजी आ. वीरेंद्र जगताप, माजी मंत्री डाॅ.सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते मिलींद चिमोटे,प्रवीण मनोहरे यांच्यासह जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते व अनुयायी सहभागी झाले होते. चैत्यभूमीप्रमाणे ही श्रद्धाभुमी निर्माण व्हावी, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

आ. वानखडे यांचा भावी खासदार असा उल्लेख दर्यापूरचे आ. बळवंत वानखडे हे काँग्रेसचे भावी खासदार आहेत, असे नया अकोला येथील सभेत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले. विशेष बाब अशी की, याआधी संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या काँग्रेसच्या सभेत तत्कालीन मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनीही आ. वानखडे यांचा भावी खासदार असा उल्लेख केला होता. आ. वानखडे हे काँग्रेसचे खासदार पदाचे उमेदवार असावेत, अशी इच्छा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची असल्याचे शहर काँग्रेस अध्यक्ष शेखावत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...