आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीचे टेक्स्टाइल्स पार्क औरंगाबादला पळवण्याचे षड्यंत्र रचले जात असून, भाजपकडून केवळ श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप करून भाजप राजकारणापायी जिल्हयाच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. मात्र अमरावतीचे नुकसान झालेले सहन करणार नसल्याचा इशारा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी भाजपला दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया लाईव्हद्वारे शनिवारी (दि. ३०) जनतेशी संवाद साधला.
अमरावती येथील नांदगांव औद्योगिक वसाहती बाबत सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी जनतेशी संवाद साधत अमरावतीचे टेक्स्टाइल्स पार्क या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की टेक्स्टाइल्स पार्क काँग्रेसची देण असून, टेक्स्टाइल्स पार्कमधील सर्व ‘एमओयू’ काँग्रेसच्या काळात करण्यात आले आहेत. आम्ही अखंड महाराष्ट्रवाले, वेगळ्या विदर्भाची मागणी भाजपची आहे. ती तेही पूर्ण करू शकले नाहीत.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने सातत्याने ऑपरेशन लोटस राबवले. यामध्ये नेमके केंद्रीय यंत्रणांचा कसा वापर करण्यात आला ते जनतेसमोर आहे. जसे अमरावतीचे महत्व आहे, तसे औरंगाबादचे महत्त्व हे वेगळे त्यामुळे टेक्स्टाइल्स पार्क पळवण्याचे राजकारण करू नये. उलट अमरावतीच्या विकासासाठी एकत्र या, खोटंनाटं आरोप करण्याचा खेळ थांबवा. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे आरोप सुरू आहेत, या आरोपांनी कुणाचे भले होणार नाही. यात अमरावतीचे नुकसान होईल आणि अमरावतीचे नुकसान झालेले आम्ही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.