आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलाढाल:गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल

अमरावती/अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहक अधिक पसंती देतात. अकोल्यासह अमरावती, यवतमाळच्या बाजारात आज ग्राहकांची विविध वस्तू खरेदीसाठी अधिक गर्दी दिसून आली. यामध्ये वाहने, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, चांदी अशा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले, तर बुलडाणा जिल्ह्यात वाहन, सोनेचांदी तसेच रिअल इस्टेटचेही मार्केट डाऊन असल्याचे दिसून आले.

अमरावती जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात सुमारे १९० चारचाकी तर १ हजारांवर दुचाकींची विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच रिअल इस्टेटमध्येही १०० नागरिकांनी घरांचे बुकिंग केले. सोने चांदीच्या बाजारात मात्र फार तेजी नव्हती. परंतु १० ते १२ कोटी रुपयांचे व्यवहार सराफात झाले असल्याची माहिती आहे. आज दिवसभरात सुमारे १५ कोटींची उलाढाल इलेक्ट्रॉनिक्स बाजारात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अकोल्यात ८ कोटींच्या वाहनांची विक्री : गुढीपाड्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यात दुचाकी-चारचाकी वाहनांची एकूण अंदाजे ७ कोटी ८५ लाखांची विक्री झाली. यात ५ कोटी ५८ लाखांच्या कारचा समावेश असून, २ कोटी २५ लाखांच्या दुचाकींची विक्री झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षात अनेक कडक टाळेबंदी लावण्यात आली होती. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी निर्बंध शिथिल करण्यात आले आणि आता तर संपलेच आहेत. तसेच अर्थचक्रही हळूहळू रूळावर येत आहे.

यवतमाळमध्ये सोने खरेदीसाठी उत्साह

राज्य सरकारने कोरोना संदर्भात सर्व निर्बंध मागे घेतल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी शनिवारी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सराफ बाजारही सज्ज झाला असून, शनिवारी मुहूर्तावर यवतमाळ जिल्ह्यातील २५० ते ३०० सराफा दुकानात जवळपास कोटींची सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शनिवारी सोन्याचा भाव ५२ हजार रुपये प्रति तोळा होता. कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या सराफांसाठी यंदाचा गुढीपाडवा सकारात्मक राहिले. गुढीपाडव्याला सोनेखरेदी केली जाते. यंदा हा सण शनिवारी आल्यामुळे प्रत्यक्ष दालनात येऊन सोने खरेदी करण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के होते, असे सराफांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...