आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा प्रशासनाद्वारे शहरातील स्वच्छतेचे कंत्राट झोननिहाय देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सफाई कंत्राटदारांनी याला विरोध करतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आमचा या स्वच्छता कंत्राटाला विरोध नाही. परंतु, ४ वर्षांआधी केलेल्या करारानुसार आम्हाला आणखी एक वर्षाचे प्रभागनिहाय कंत्राट मिळणे गरजेचे आहे, असे कंत्राटदारांनी सांगितले. मनपाने शहरातील स्वच्छतेचे कंत्राट झोननिहाय देण्याचा निर्णय घेतला असून, निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. मनपाच्या २२ प्रभागांच्या स्वच्छतेचे कंत्राट ४ वर्षांआधी प्रभागनिहाय देण्यात आले होते.
त्यावेळी झालेल्या करारनाम्यानुसार ३ वर्षांचे कंत्राट पूर्ण झाल्यानंतर आणखी एक-एक वर्ष वाढवून देण्याचाही निर्णय झाला होता. या करारानुसार ५ वर्षे संबंधित कंत्राटदारांना कंत्राट मिळणे आवश्यक होते. एवढेच नव्हे तर चौथ्या वर्षी ८ टक्के आणि पाचव्या वर्षी ७ टक्के रक्कम वाढवून देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र, कोरोना काळात सलग दोन वर्षे काम केल्यानंतरही कंत्राटाची रक्कम वाढवून देण्यात आली नाही.
सहा वर्षाची अग्रीम रक्कम मनपाकडे असल्याची माहिती मनपा सफाई कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष संजय माहुलकर यांनी दिली. करारानुसार एक वर्ष स्वच्छता कंत्राटाचे शिल्लक असतानाही मनपा आयुक्तांनी झोननिहाय स्वच्छता कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्वच्छता कंत्राटदारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र येत १२ कंत्राटदारांनी झोननिहाय कचरा कंत्राटाबाबत जी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे, त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करून न्याय मागितला आहे. या प्रकरणी पुढे काय होणार याचीच आता उत्सुकता लागून राहिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.