आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील स्वच्छता कंत्राटदारांचे धुवारणी, फवारणीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे कीटकजन्य आजार बळावले असून, नाल्या तुंबून जागोजागी त्यात सांडपाणी साचले आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात डास, माशा, किटकांनी अंडी घातल्यामुळे किटकांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वास्तव दिव्य मराठीने शहरातील विविध भागांत विशेषत: सीमावर्ती भागात केलेल्या पाहणीत आढून आले. धुवारणी, फवारणी होत नसल्याने आम्ही चांगलेच त्रस्त झालो आहोत. मनपा प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांनी दिल्या आहेत.
डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफाॅईड, स्क्रब टायफस, यलो फिव्हर असे आजार बळावू नये म्हणून आठवडयातून किमान दोनदा शहरातील प्रत्येक वाॅर्डात धुवारणी, फवारणी करणे करारानुसार बंधनकारक असताना शहरातील २३ कचरा कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा असंतोष निर्माण झाला की, वर्षातून एकादवेळी कोणाकडून तरी यंत्रे मिळवून दिखावा करतात. कारण त्यांच्याकडे धुवारणी, फवारणी करणारी पुरेशी यंत्रेच नाहीत, असे शहरवासीयांनी सांगितले. आम्हाला सध्या मच्छरदाणी, डास प्रतिबंधक आैषधीचा आधार घ्यावा लागतो. यात मनपाला स्वच्छतेसाठी कर देत असतानाही नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, अशा शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
धुवारणी, फवारणी होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी आ. प्रवीण पोटे यांनीही मनपा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. यंत्रे आणून दाखवा असे बजावले होते. परंतु, स्वास्थ्य निरीक्षकांना ती दाखविता आली नाहीत, हे विशेष.
सध्या सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहेत. तरीही परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे. परंतु, जर वेळीच धुवारणी, फवारणी सुरू केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जायलाही वेळ लागणार नाही. कारण शहरासह जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत डेंग्यूचे १३९, मलेरियाचे ५६, स्क्रब टायफसचे ३८, टायफाॅईडचे १३७, चिकन गुनियाचे ४५ रुग्ण आढळले आहेत.
स्वच्छता कंत्राटदारांची देयकं थकीत : मनपाने स्वच्छता कंत्राटदारांची देयकं थकीत ठेवल्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. विशेषत: कीटकांचे जेथे वास्तव्य असते, अशा उघड्या नाल्यांची नियमितपणे स्वच्छता होणे आवश्यक असताना ती केली जात नाही. धुवारणी, फवारणी तर मग दूरची बाब राहिली. कारण यासाठी खर्च करण्यास त्यांच्याकडे पुरेसे पैसेच नाहीत, असे मत काहींनी व्यक्त केले.
नगरसेवक माजी झाले कंत्राटदार ऐकेनात : नगरसेवक माजी झाले आहेत. नगरसेवक असताना नागरिकांच्या तक्रारी आल्या की, ते तत्काळ कचरा कंत्राटदारांकडून काम करून घ्यायचे. परंतु, आता कचरा कंत्राटदारांवर त्यांचा वचक राहिला नाही. ते माजी नगरसेवकांचे ऐकेनासे झाले आहेत. धुवारणी, फवारणी नित्याचीच बाब असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
दंडात्मक कारवाईचाही परिणाम नाही : धुवारणी, फवारणी न करणाऱ्या काही कंत्राटदारांना १० हजारापर्यंत आर्थिक दंड ठोठावण्यात आला. परंतु, त्याचा त्यांच्यावर काहीएक परिणाम झाला नाही. ते कोणाचेही ऐकत नाहीत. वारंवार फोन केल्यानंतरही होय बघू, माणसे दुसरीकडे गेली, अशी कारणे सांगितली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
नियमानुसार धुवारणी, फवारणी करावी
आमच्या भागात कचरा उचलणारी गाडी येते. परंतु, कंत्राटदारांकडून धुवारणी व फवारणी होत नाही. त्यामुळे रोगराई वाढणार की काय, अशी भिती वाटते. आम्ही कर भरतो. त्यातून कंत्राटदारांना पैसे मिळतात. त्यांनीही नियमानुसार धुवारणी, फवारणी करावी. -प्रिया कंचनपुरे, नागरिक, जेवडनगर.
कंत्राटदाराकडून तक्रारीचीही दखल नाही
आमच्या परिसरात उघड्या नाल्यांची स्वच्छता तर नियमितपणे होत नाहीच. त्यात धुवारणी, फवारणी होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारीचीही दखलही कंत्राटदार घेत नाहीत.-सारिका ठाकरे, नागरिक, मेहेरबाबा नगर.
स्वच्छता होत नसल्याने आजारांना आमंत्रण
एकतर नियमितपणे नाल्यांची सफाई होत नाही. त्यामुळे डासांसह इतरही कीटक वाढले आहेत. त्यात आवश्यकता असताना धुवारणी, फवारणी केली जात नाही. त्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असून आम्ही त्रस्त आहोत. -राहुल कोठाळे, नागरिक, विलासनगर, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.