आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहविलगीकरण:होम आयसोलेट रुग्णांच्या घरांमधील कचरा सर्वसामान्यांसाठी धोकादायक

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या अमरावती शहरात 1 हजार 142 पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात
  • गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरचा संकलीत कचरा तसेच इतर कचरा कंपोस्ट डेपोवर एकत्रच फेकला जात असल्याचे धोकादायक चित्र आहे.

एकीकडे जिल्हा व मनपा प्रशासन काेरोना प्रतिबंधक उपायांसाठी जीवाचे रान करीत असताना शहरासह ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरामधील घातक कचरा वेगळा संकलित केला जात नाही. त्यामुळे हा घातक कचरा सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळेही कोरोना संसर्ग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बरे हा कचरा शहरातील सुकळी, अकोली या कंपोस्ट डेपोत टाकला जातो. तेथे शेकडो कर्मचारी काम करतात, त्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शहरात सध्या १ हजार १४२ रुग्ण गृह विलगीकरणात असून आतापर्यंत १२ हजार २७१ रुग्णांनी ओम आयसोलेट राहून उपचार घेतले आहेत. ग्रामीण भागात तर सध्या ३ हजारावर रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. अशा रुग्णांनी वापरलेले मास्क, त्यांच्या घरातून निघणारा कचरा वेगळा संकलित करण्याची व्यवस्थाच प्रशासनाकडे नसल्यामुळे त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील तसेच कोरोना संक्रमितांच्या घरातील कचराही एकत्रितपणेच संकलित केला जात आहे. त्यामुळे कचरा संकलित करणारे सफाई कर्मचारी व इतर नागरिकांच्या आराेग्याला धोका निर्माण झाला आहे.

गृह विलगीकरणात उपचार घेणारे अनेक रुग्ण असे आहेत, ज्यांच्याबद्दल प्रारंभी काही िदवस शेजाऱ्यांनाही माहिती नसते. गृह विलगीकरणातील रुग्ण बेजबाबदारपणे बाहेर फिरत असल्याने मनपाच्या पथकाद्वारे त्यांच्यावर कारवाया सुरूच आहेत. अजूनही अनेक रुग्ण असे आहेत, जे गोपनीयतेचा लाभ घेत नियमांचे उल्लंघन करीत आहेत. गृह विलगीकरणातील रुग्ण वापरत असलेले मास्क, सिरींज, अन्य वस्तू त्यांनी वेगळ्याच ठेवाव्यात. त्या वेगळ्या संकलित करण्याची सोय करणे गरजेचे आहे. तसेच त्यासाठी वेगळा कंटेनर असावा. त्यामुळे इतरांना त्यापासून धोका होणार नाही. या कचऱ्याचा व्यवस्थित निचरा करता येईल. मात्र सध्या गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांद्वारे फेकला जाणारा कचरा सुकळी, अकोली बायोमायनिंग डेपोतच फेकला जात आहे. एवढेच नव्हे तर उघड्या नाल्यांमध्येही कचरा टाकला जातो. त्यामुळेही संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ते बघता गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरून निघणाऱ्या कचऱ्याची उचल करण्याची वेगळी सोय व्हायला हवी, अशी मागणी नागरिकांद्वारे होत आहे.

रुग्णालयातील बायोवेस्टसाठी वेगळी व्यवस्था
शहरातील विविध रुग्णालयांमधून निघणाऱ्या बायोवेस्टचे संकलन तसेच विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया वेगळी केली जाते. यासाठी मनपाद्वारे विशेष प्रकल्प राबवला जात आहे. कंत्राटदार कंपनीच्या कचरा उचल करणाऱ्या गाड्या दररोज रुग्णालयांमधील कचरा संकलित करून तो प्रक्रियेसाठी पाठवत असतात, अशी माहितीही मनपा वैद्यकीय स्वच्छता अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...