आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवारी दिवसभरात ५९७ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येने आजपर्यंतची सर्वांत मोठी संख्या गाठली आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासांत चौघांचा मृत्यूही ओढवला आजच्या या विक्रमी पॉझिटिव्ह संख्येमुळे जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरले असून, शुक्रवारपासून जिल्हाभरातील बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी आठवड्याच्या शेवटी ३६ तासांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अर्थात शनिवारी सायंकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ या वेळात अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दळणवळण बंद ठेवले जाईल.
कोरोनाने गेल्या आठवडाभरापासून थैमान घातले असून गेल्या पाच दिवसांतील नव्या रुग्णांची संख्या ही पाचशेच्या घरात असायची. आज तर ती थेट ५९७ वर पोहोचली आहे. त्यामुळे अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हा समूह संसर्गाच्या दिशेने पुढे सरकत असून, कठोर निर्णय न घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर निर्णय लागू केले आहेत.
या निर्णयानुसार, हॉटेल, रेस्टाँरेंट, मंगल कार्यालयांसह संपूर्ण बाजारपेठ रात्री ८ पर्यंतच सुरु ठेवता येईल. शिवाय शनिवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण दळणवळण बंद ठेवले जाईल. वैद्यकीय उपचार, औषधी खरेदी, किराणा, दुध-दही, भाजीपाला या अत्यावश्यक देवाण-घेवाणसाठीच नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेऊन घराबाहेर पडता येईल. दरम्यान, पुढच्या निर्णयापर्यंत सर्व प्रकारची क्रीडांगणे, सामुहिक खेळ यांवरही बंधने लादण्यात आली असून, वडाळी गार्डन, छत्री तलाव, बांबू गार्डन यासह जिल्हाभरातील पर्यटन केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
गुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान मृत झालेल्या चार कोरोनाबाधितांमध्ये दस्तुरनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, छाबडा प्लॉटमधील ७१ वर्षीय पुरुष, अर्जुननगर येथील ६८ वर्षीय पुरुष व राहटी (ता. कारंजा लाड) येथील ३१ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या चौघांवरही जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने मृत झालेल्यांची संख्या ४५२ झाली आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरासह जिल्ह्यातील व्यापारी तसेच प्रतिष्ठानांतील कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अशी आहे ‘कोराना’ची दंडात्मक तरतूद
‘विकेंड’लॉकडाऊनदरम्यान बाहेर जाणाऱ्या व येणाऱ्यांनी कागदपत्रे बाळगावे
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे दर आठवड्यात शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी आठ असा ३६ तासांचा विकेंड लॉकडाऊन गुरूवार (दि. १८) जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लागू केला. लॉकडाऊनच्या ३६ तासांत शहरातून बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेरून शहरात येण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय मनाई आहे. याचवेळी अत्यावश्यक कामासाठी येणे किंवा जाणे गरजेचे असेल तर कामकाजाचे कागदपत्र सोबत बाळगावे, अन्यथा पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाच्या सूत्रांनी कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.