आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Corona Testing Pornography | Amravati | Crime | Marathi News | Obscene Acts With A Young Woman During A Corona Test; The Court Sentenced Him To Ten Years

हॉस्पिटलमध्ये घृणास्पद प्रकार:कोरोना चाचणीवेळी युवतीशी अश्लील कृत्य; न्यायालयाने सुनावली दहा वर्षांची शिक्षा

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीड वर्षांपूर्वी बडनेराच्या मोदी हॉस्पिटलमध्ये घडला होता घृणास्पद प्रकार

कोरोना चाचणीसाठी गेलेल्या एका तरुणीचा स्वॅब घेतेवेळी तिच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने बुधवारी (दि. २) १० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २८ जुलै २०२० रोजी दुपारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मोदी ट्रॉमा केअर रुग्णालयात घडली होती.

अल्केश अशोकराव देशमुख (३२, रा. पुसदा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, या प्रकरणातील पीडिता कार्यरत असलेल्या डिपार्टमेंटल स्टोअरमधील एक कर्मचारी २४ जुलै २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यामुळे स्टोअरमधील २० सहकर्मचाऱ्यांना २८ जुलै रोजी दुपारी बडनेरा येथील मोदी ट्रामा केअर हॉस्पिटल येथे कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले स्वॅब देण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी अल्केश देशमुख हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे तोंडाद्वारे स्वॅब घेण्याची जबाबदारी होती. यावेळी अल्केशने पीडितेसह तिची मैत्रिण व इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले.

त्यानंतर त्याने पीडितेला तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तुझा आणखी एका ठिकाणचा स्वॅब घेऊन टेस्ट करावी लागेल, असे म्हटले. त्यामुळे पीडितेने याबाबत आपल्या मैत्रिणीला माहिती दिली. त्यानंतर दोघींनी अल्केशकडे जाऊन रुग्णालयात महिला कर्मचारी नाही का, अशी विचारणा केली. त्यावर अल्केशने तुम्हाला वाटल्यास परत जाऊ शकता, असे म्हटले. त्यानंतर अल्केश हा दोघींनाही आतमधल्या खोलीमध्ये घेऊन गेला. त्याने पीडित तरुणीच्या शरीरातील खासगी अवयवातून स्वॅब घेण्याचे अश्लील कृत्य केले.

त्यानंतर पीडिता ही आपल्या कार्यस्थळी परत आली. मात्र, या प्रकाराबाबत संशय आल्याने पीडितेने तिच्या भावाला माहिती देऊन चौकशी करायला लावली. त्यानुसार भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नाक किंवा तोंडाद्वारे व्यतिरिक्त कोरोना चाचणीसाठी इतरत्र कुठूनही कोणतीही चाचणी होत नसल्याचे समोर आले. त्यानंतर पीडितेला मोबाइलवर काही मॅसेज आले.

त्यामुळे पीडितेने संबंधित क्रमांकावर संपर्क साधून आपण कोण आहे, अशी विचारणा केली. त्यावर स्वॅब घेणारा मीच असल्याचे अल्केशने सांगितले. त्यावेळी आपली फसगत झाल्याचे तरुणीला लक्षात आले. त्यामुळे पीडितेने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अल्केशविरुद्ध बलात्कार, विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयात १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने अल्केश देशमुख याला १० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील अ. देशमुख यांनी यशस्वी युक्तीवाद केला.

संपूर्ण राज्यात उडाली होती खळबळ
हा प्रकार घडला त्यावेळी कोरोनाची पहिली लाट सुरू होती व कोरोनाच्या नावानेच सर्वसामान्यांना धडकी भरायची. दरम्यान, सहकर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळेच पीडीत तरुणी व इतर सहकारी कोरोना चाचणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अल्केश देशमुखने तरुणीचा स्वॅब घेताना अश्लील कृत्य केले होते. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...