आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण सिनेटर, कोण विद्वत परिषदेवर ? उद्या फैसला:आठ टेबलांवर चालेल 43 मतदारसंघांची मतमोजणी

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे सिनेटर कोण यासह विद्वत परिषद आणि अभ्यासमंडळांचे प्रतिनिधी कोण, याचा फैसला उद्या, मंगळवार, 22 नोव्हेंबरला होणार आहे.

विद्यापीठाच्या अधीसभा (सिनेट), विद्वत परिषद (अ‍ॅकडेमीक कौन्सील) व अभ्यास मंडळांच्या (बीओएस) प्रतिनिधींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी उद्या, मंगळवार, 22 नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी वनस्पतीशास्त्र विभाग व ज्ञानस्रोत केंद्राची अभ्यासिका येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

निकालासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत पाहावी लागणार वाट

वनस्पतीशास्त्र विभागातील सहा आणि अभ्यासिकेतील दोन अशा 8 टेबलांवर मतमोजणीचे कार्य चालेल. सकाळी 8.00 वाजता मतमोजणी सुरू होईल. परंतु सर्व मतपत्रिकांची पडताळणी, त्यातील वैध-अवैध मतपत्रिकांचे विलगीकरण, मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, विजयी होण्यासाठीचा ‘कोटा’ ठरविणे आदी प्रक्रियांमुळे प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याला दुपारचे 4 वाजतील, असे यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यातही ज्या मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या कमी आहे, तेथील निकाल लवकर घोषित होणार असून जेथे नोंदणीकृत पदवीधर आणि प्राध्यापक मतदारसंघातील मतदार व उमेदवारांची संख्या जास्त असल्याने शेवटचा निकाल घोषित होण्यासाठी 23 नोव्हेंबरच्या पहाटेची प्रतीक्षा करावी लागेल, असा विद्यापीठ प्रशासनाचा अंदाज आहे.

मतमोजणीसाठी लागणार जास्त कालावधी

सिनेटच्या 36, विद्वत परिषदेच्या 6 आणि एक अभ्यास मंडळ अशा 43 मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडली. सिनेटमध्ये नोंदणीकृत पदवीधरांना निवडून देण्यासाठी 45 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून प्राचार्य, प्राध्यापक, बीओएस व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी या चार मतदारसंघांमध्ये सुमारे 95 टक्के मतदान झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. ही निवडणूक पसंतीक्रमाद्वारे केली जात असल्याने यामध्ये मतपत्रिकेचा वापर करण्यात आला. त्यामुळे मतमोजणीला भरपूर कालावधी लागणार असून पहिला निकाल हाती यायला कदाचित सायंकाळ उजाडेल, असे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.

असे उमेदवार, असे मतदान

एकूण मतदारांमध्ये पदवीधर मतदारांची संख्या 35 हजार 659 आहे. यापैकी 45 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिनेटच्या 36 जागांसाठी 100 तर विद्वत परिषदेच्या 6 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. यापैकी कोण बाजी मारणार, हे मतमोजणीअंती स्पष्ट होईल. शिक्षक (प्राध्यापक) मतदारांची संख्या 3 हजार 413 असून शिक्षण संस्थाचालकांच्या प्रतिनिधींची संख्या 239 आहे. प्राचार्य मतदारसंघाची मतदार संख्या 119 असून विद्यापीठ शिक्षकांची संख्या सर्वात कमी 59 आहे.

असा ठरणार विजयाचा कोटा

पसंतीक्रमाद्वारे निवडणूक होत असल्याने येथे प्रत्येक मतदारसंघातील विजयी उमेदवारासाठी कोटा ठरविला जाणार आहे. एकूण वैध मतदानाला जागांच्या संख्येने भाग दिल्यानंतर जे उत्तर येईल, त्यात एक हा अंक मिळविल्यानंतर येणारी संख्या म्हणजे त्या-त्या मतदारसंघाचा कोटा होय.

बातम्या आणखी आहेत...