आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोर्ट पैरवी अंमलदारांनाही न्यायालयामध्ये आता स्कॅन करावा लागणार क्यू आर कोड;जिल्हा, तालुकास्तर न्यायालयातील पोलिसांना बंधनकारक

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा न्यायालयासह प्रत्येक तालुका ठिकाणी असलेल्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात पैरवी अंमलदार कार्यरत आहेत. काहीवेळी तक्रारदार, साक्षीदार न्यायालयात पोहोचतात मात्र पैरवी अंमलदार वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळेच प्रत्येक न्यायालयात कार्यरत पैरवी अंमलदारांना त्यांची हजेरी नोंदवण्यासाठी आता ‘क्युआर कोड’ स्कॅन करावा लागणार आहे. लवकरच प्रत्येक न्यायालयात क्यू आर कोड लावण्यात येणार असल्याची माहिती एसपी अविनाश बारगळ यांनी दिली आहे.

संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जे प्रकरण न्यायालयात सुरू असेल, त्या प्रकरणातील तक्रारदार, साक्षीदारांना न्यायालयात प्रकरणाविषयी सखोल माहिती देवून मदत करण्यासाठी पैरवी अंमलदार कार्यरत असतात. त्यामुळे ज्या न्यायालयात प्रकरण असेल त्या ठिकाणी तक्रारदार, साक्षीदार जात असतात. अनेकदा तक्रारदार, साक्षीदार हे सकाळी दहा वाजताच न्यायालयात पोहोचतात मात्र, संबंधित पैरवी अंमलदार वेळेवर येत नाहीत.

पैरवी अंमलदार वेळेवर न आल्यास संबंधित प्रकरणात साक्षीदार किंवा तक्रारदाराला जी काही मदत व्हायला पाहिजे, त्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अशा काही तक्रारी एसपींकडे आलेल्या आहेत. त्यामुळेच एसपी बारगळ यांनी जिल्हा न्यायालयात पैरवी अंमलदारांसाठी असलेल्या खोलीत ‘क्यूआर’ कोड चिपकवण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजता पैरवी अंमलदाराने स्कॅन न केल्यास तत्काळ ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळणार आहे.

रात्रगस्तीसाठी प्रभावी ठरता हेत क्यू आर कोड
दीड महिन्यांपूर्वी जिल्हाभरातील महत्वाच्या ठिकाणी सुमारे ६०० क्यू आर कोड ग्रामीण पोलिसांनी लावले आहेत. रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकारी, अंमलदारांना गस्तीदरम्यान तो कोड स्कॅन कराणे बंधनकारक आहे. सद्या ही प्रणाली यशस्वीपणे कार्यरत आहे. -अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक.

बातम्या आणखी आहेत...