आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्हाला लस केव्हा मिळेल? आमचा नंबर केव्हा लागेल? त्यासाठी किती दिवस वाट बघावी लागेल? असे असंख्य प्रश्न अनुत्तरीत असतानाच जिल्ह्यात तब्बल दहा टक्के लस वाया गेल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे हे वास्तव मानवनिर्मित असून ते सर्वदूर आहे. त्यामुळे यंत्रणेत आता कुठे खलबते सुरु झाली असून भविष्याचे नियोजन केले जात आहे. कोरोनावर मात करणारी लस ही एका छोट्या बॉटलमध्ये उपलब्ध आहे. ‘कोवीशिल्ड’ असो वा ‘कोव्हॅक्सीन’ तीचे बॉटल मधील आकारमान एकसारखेच आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एका बॉटलमध्ये दहा रुग्णांचा डोज असतो आणि पहिला डोज देण्यासाठी जेव्हा ती बॉटल फोडली जाते, तेव्हापासून अवघ्या चार तासांच्या आतच त्यातील संपूर्ण औषधी संपवावी लागते. परंतु प्रत्येक केंद्रावर लस देताना दहा-दहाचा गट तयार करुन ती देणे, शक्य नाही. परिणामी शेवटच्या गटात पाचच व्यक्ती असतील, तर निम्मे औषध वाया जाते, सात व्यक्ती असतील तर तिघांना पुरेल एवढे औषध फेकून द्यावे लागते आणि आठ व्यक्ती असतील दोघा जणांचे औषध वाया जाते. ढोबळमानाने आतापर्यंत किमान १० टक्के औषध वाया गेल्याचे पुढे आले आहे. ही स्थिती केवळ अमरावती जिल्ह्याचीच नाही, देशभर असेच सुरु आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ११ ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालये आणि शहरातील १३ केंद्रे अशा ८६ ठिकाणी लसीकरणाची सोय आहे. त्याद्वारे आजपर्यंत ८० हजार व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले. हे करताना एकूण लसीपैकी अंदाजे दहा टक्के लस वाया गेली असावी, असे डॉ. निकम यांचे निरीक्षण आहेे. अर्थात तब्बल ८ हजार जणांना पुरेल एवढी औषधी अक्षरश: फेकून द्यावी लागली. त्यामुळे लसीसाठी धडपड करणाऱ्या परंतु निकषात न बसणाऱ्या नागरिकांसाठी हे वास्तव पचवणे फार अवघड आहे. दोन्ही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे टाळणे कोठेही शक्य झाले नाही. त्यामुळे देशभर अशीच स्थिती आहे. शेवटच्या टप्प्यात जेवढे नागरिक लस घेण्यासाठी उपस्थित होतात, ते संख्येने दहा नसले तरी त्यांना लस द्यावीच लागते. त्यामुळे उरलेली लस वाया घालवण्याशिवाय पर्याय नसतो. विशेष असे की, बॉटल फोडल्यानंतर ती एका ठिकाणाहून सहजतेने दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य नाही. किंबहुना शेवटच्या टप्प्यातील दोन-चार लाभार्थ्यांची केंद्रे ऐनवेळी बदलून त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगणेही शक्य नाही. नाहीतर या अदलाबदलीतूनही वाया जाणारी लस काही प्रमाणात वाचवता आली असती.
अमरावतीत बदलणार मॉडेल
नोंदणी झालेल्यांना अलॉट झालेल्या केंद्रांवर लस द्यावीच लागते. तसेच वेळेवर नोंदणी करणाऱ्यांनाही लस दिली जाते. अशा स्थितीत ती वाया जाण्यापासून वाचवणे सहज शक्य नाही. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणेतीलच काही लाभार्थ्यांना राखीव ठेऊन रिकाम्या जागा पूर्ण करणे, असे मॉडेल अंगीकारता येईल का ते बघू. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.
सूचनेनुसार मॉडेल बदलणार
सध्या ज्यांचे लसीकरण केले जात आहेत, ते वृद्ध व सहव्याधी असलेले नागरिक आहेत. परंतु तरीही शासनाने मॉडेल बदलण्याच्या सूचना दिल्या, तर तसे करता येईल. - डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक.
शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट
लसीकरणानंतर पूर्णत: व अर्धवट रिकाम्या झालेल्या बॉटलची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाते. जिल्ह्यात दोन्ही प्रकारच्या औषधींचा वापर केला जात आहे. - डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
लसीकरणासाठी वयोगटाचे बंधन खुले होणे आवश्यक
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सुमारे वर्षभराच्या प्रयत्नानंतर लस तयार करण्यात यश आले. या यशानंतर अख्खा देश आनंदून गेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्यामुळे लस एकदाची केव्हा मिळते, असे प्रत्येकालाच वाटू लागले आहे. परंतु लसीकरणासाठी शासनाने वयानुरुप व आजारानुरुप टप्पे पाळले असून त्यानुसार ही मोहिम पुढे रेटली जात आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना लस घेणे सध्यातरी शक्य नाही. शासन जेव्हा ती खुली करेल, तेव्हाच प्रतीक्षा संपुष्टात येईल.
यंत्रणेत सुरू आहेत खलबते
वाया जाणारी लस वाचवणे प्रत्यक्षात शक्य नाही. परंतु त्यातही काही ठिकाणी योग्य मार्ग शोधून काढण्यात आला असून दहा-दहाच्या गटानेच औषधी देणे सुरु आहे. त्यामुळेच की काय खुद्द पंतप्रधानांनी बुधवारच्या मुख्यमंत्र्यांच्या संवादादरम्यान याचा पुसटसा उल्लेख केला असून लस वाया जाणार नाही, याचे नियोजन केले जावे, अशा सूचना दिल्या आहेत. या संवादाचे लोण थेट जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले असून आता अधिकारी त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.