आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशव्यापी अभियान:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून भाकपची एक महिना ‘भाजप हटाव- देश बचाव’ मोहीम

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपप्रणित नरेंद्र मोदी सरकारच्या धोरण व कार्यपद्धतीमुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी आणि विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, कामगार, मजूर, बेरोजगार, महिला, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी तसेच समता, धर्मनिरपेक्षता, संवैधानिक लोकशाहीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ‘भाजप हटाव–देश बचाव’ ही देशव्यापी जनजागरण मोहीम आखण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून म्हणजेच १४ एप्रिलपासून ही मोहीम सुरु होत असून ती १५ मेपर्यंत राबविली जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार असून या कार्यक्रमांची आखणी आताच पार पडलेल्या जिल्हा कौन्सील बैठकीत करण्यात आली. बैठकीदरम्यान माजी राज्य सचिव तुकाराम भस्मे व जिल्हा सचिव सुनील मेटकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर अभियानाचे पोस्टरही प्रकाशित करण्यात आले.

सर्व जाती-धर्म व पंथाच्या नागरिकांना विकासाची समान संधी देण्यासोबतच विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याच्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ गाभ्यावर केंद्र सरकारने प्रहार करणारे कायदे केले आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांचे जीवन अस्थिर झाले असून एनआरसी–सीएएसारखे नागरिकत्वाचे पुरावे मागितले जात आहेत. अल्पसंख्य समुदायावर ही एकप्रकारची दहशतच लादली जात आहे.

कधी मॉब लिंचिंग, तर कधी भोंग्यावरुन तणाव; कधी हिजाबवरुन वादंग तर कधी लव्हजिहादवरुन दुष्प्रचार करुन, संघ-भाजपा सत्तेच्या आधाराने समाजातील शांतता नष्ट करीत आहे. या असहिष्णू व्यवहारातून पुरोगामी विचारवंतांचे खून पाडण्याच्या घटनाही घडविल्या जात आहेत. सत्तेच्याविरुद्ध विचार मांडणाऱ्या विचारवंत, पत्रकारांना तुरुंगात डांबले जात आहे; तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने समाजात हिंसाचार, दंगे, बलात्कार, खून आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्या गुन्हेगारांना मात्र मोकाट सोडून त्यांचे सत्कार सोहळे केले जात आहेत.

बैठकीला भस्मे, मेटकर यांच्याशिवाय किसान सभेचे प्रदेश सचिव अशोक सोनारकर, आयटकचे नेते जे. एम. कोठारी व चंद्रकांत बानुबाकोडे, ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे निळकंठ ढोके, माजी तालुका सचिव शरद मंगळे, शहर सचिव हिमांशू अतकरे, चंद्रकांत वडस्कर, विनोद जोशी, प्रा. ओमप्रकाश कुटेमाटे, एमएसई वर्कर्स फेडरेशनचे महेश जाधव आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

१२ राज्यात पक्ष फोडण्याचे कारस्थान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत व्यक्तींच्या राज्यपाल म्हणून नेमणुका करत १२ राज्यांमधील पक्ष फोडून, अनेक ठिकाणी सत्तेवर कब्जा मिळविण्याचे कारस्थान केंद्रातील भाजप सरकारच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात पदावर राहिलेल्या राज्यपालाने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांची वेळोवेळी हेतू:पुरस्सर बदनामी केल्याच्या घटनाही ताज्या आहे. या सर्व मुद्द्यांना सदर अभियानाद्वारे जनतेपुढे ठेवले जाणार असल्याचे भस्मे व मेटकर यांनी स्पष्ट केले.