आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकपचे घर, घर कार्यकर्ता अभियान:18 ते 20 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसीय राज्य अधिवेशन

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅप्शन - भाकपच्या जिल्हा बैठकीला संबोधित करताना राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कानगो, मंचावर इतर मान्यवर.

  - Divya Marathi
कॅप्शन - भाकपच्या जिल्हा बैठकीला संबोधित करताना राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कानगो, मंचावर इतर मान्यवर.  

देशात सध्या गाजत असलेल्या महागाई, बेकारी व इतर मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तीन दिवसीय राज्य अधिवेशन आगामी १८ ते २० सप्टेंबर दरम्यान येथे होत आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी अलिकडेच जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन घर, घर कार्यकर्ता अभियान राबविण्याचे आवाहन केले.

रेल्वे स्टेशन चौक स्थित उर्जा भवनात ही बैठक पार पडली. पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, जिल्हा सचिव सुनील मेटकर, सहसचिव प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, कार्यालयीन सचिव जगन्नाथ कोठारी, महिला फेडरेशनच्या अ‌ॅड. क्रांती देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध साहित्यिक, कलाप्रेमी व व्याख्याते म्हणून ओळख असलेल्या डॉ. कानगो यांनी सध्याच्या राजकीय व सामाजिक, आर्थिक स्थितीवर चर्चा केली. शिवाय पक्षाने कार्यकर्त्यांसाठी जारी केलेला सामाजिक आणि राजकीय अहवाल जनतेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले.

भाकप हा सर्वहारा वर्गाचा पक्ष आहे. ज्याच्याकडे हरवल्या जाण्यासारखे काहीही नाही, अशा लोकांना संघटित करुन तो त्यांच्या न्याय, हक्कांसाठी लढतो. विशेष असे की सध्याच्या काळात त्याच नागरिकांचे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. त्यामुळे घर-घर कार्यकर्ता या सूत्रानुसार भाकपचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. अधिवेशनात या सर्वच मुद्द्यांची चर्चा होणार असून राज्यकर्त्यांना शह देण्यासाठीचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. अर्थातच आंदोलनात्मक बाबींचा त्यात भरणा असेल. त्यामुळे या मुद्द्यांसाठी जनमत तयार करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय अहवालाची मांडणी केली. बैठकीदरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राचार्य एस.एस. उटाणे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा सचिव सुनील मेटकर यांनी राज्य अधिवेशनानिमित्त जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीला अशोक सोनारकर, महेश जाधव, चंद्रकांत वडस्कर, दत्ता देशमुख, दिगंबर नगेकर, गणेश अवझाडे, निळकंठ ढोके आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...