आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक जवाहरगेट, परकोटाच्या सौंदर्याला अवकळा:कोट्यवधी रुपये गेले पाण्यात; परकोटाच्या बाजुने लॉन नव्हे तर कचराघर

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबानगरीचे ऐतिहासिक वैभव असलेले जवाहरगेट व परकोटाच्या सौंदर्याला सध्या अवकळा आली असून, देखभाली अभावी हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच जवाहरगेटसह परकोटाचे सौंदर्य सौंदर्य वाढवण्यासाठी सुमारे 10 वर्षांआधी माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रयत्नांतून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिला होता. एवढेच नव्हे तर स्प्रिंकलर लावून सतत लॉन हिरवे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच रंगीत प्रकाशझोताने परकोटाचे सौंदर्य वाढवण्यात आले.

परकोटाचे सौंदर्य अबाधित राहावे म्हणून या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. जेणेकरून त्याच्या बाजुला फेरीवाले उभे राहू नयेत, तसेच परकोटा लगतच्या लॉनवर कचरा होऊ नये. अगदी 2020 पर्यंत या परकोटाच्या लॉनवर पडलेला पाला-पाचोळाही उचलला जात होता. परंतु, कोराना काळातील दोन वर्षांत परकोटाकडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष झाले आणि त्याचे सौंदर्य लयाला गेले. परकोटाचे जुने सौंदर्य परत मिळावे तसेच शहरात ज्या जवाहर गेटवर स्वतंत्र भारताचा पहिला तिरंगा मानाने फडकला होता त्या जवाहर गेटचेही ऐतिहासिक स्मारक म्हणून सौंदर्य वाढावे यासाठी काही संघटनांसह राजकीय पक्षांनीही आता पुढाकार घेतला आहे.

परकोट, जवाहर गेटचे सौंदर्य घालवून जनतेच्या पैशाचा अपव्यय : शिवसेना

ऐतिहासिक परकोटाचे गांधी चौक, जवाहर गेट, टांगा पडाव या परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आले. यासाठी जनतेवर विविध प्रकारचे कर आकारून त्या पैशातून अमरावती शहराचा वारसा असलेल्या जवाहर गेट परिसराचे रूप देखणे करण्यात आले. परंतु, गेल्या काही वर्षापासून सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या साहित्याची तुट-फुट झाली आहे. स्प्रिंकलर बंद पडले असून परकोटाच्या भिंतीतून झाडे बाहेर निघालेली आहेत. त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत आहेत. परकोट रात्री उजळून निघावा म्हणून मोठ्या प्रमाणात रंगीत लाईट लावण्यात आले होते. तेही मोडकळीस आले आहेत. लॉनही उद्ध्वस्त झाले असून तेथे मोठमोठी झाडे उगवली आहेत.

त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. तसेच परकोटाचे जुने सौंदर्य परत आणावे, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, श्याम देशमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा भोयर, युवा सेनाप्रमुख राहुल माटोडे व इतर शिवसैनिकांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे केली.

बातम्या आणखी आहेत...