आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध सुरू:गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवर नाचताना लाथ लागली; युवकावर मित्रानेच केला जीवघेणा हल्ला

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मारोतीनगर भागात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. डीजेच्या तालावर सर्वांनी ठेका धरला होता. दरम्यान, एका तरुणाला नाचत असतानाच दुसऱ्याची लात लागली. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर काही वेळाने ज्याने लात मारली त्याला घरी जावून दुसऱ्याने चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. ११) सायंकाळी घडली असून उशिरा रात्री गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम श्रीकृष्ण गुल्हाने (२०, रा. जुना अकोली रोड, मारोतीनगर) असे जखमी तसेच तक्रारदार तरुणाचे नाव आहे. याचवेळी निखिल रामकृष्ण भालेराव असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रेम व निखिल हे दोघेही एकाच परिसरात राहतात. रविवारी सायंकाळी याच परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक निघाली होती. यावेळी विसर्जन मिरवणुकीत डीजेवर नाचत असताना निखिल याला प्रेमची लाथ लागली व तो खाली पडला. या कारणावरून त्याच ठिकाणी दोघांमध्ये बाचाबाची व झोंबाझोंबी झाली.

त्यामुळे प्रेमच्या आईने मध्यस्थी करुन प्रेमला घरी नेले. त्यानंतर काही वेळाने निखिल विसर्जन मिरवणुकीतून प्रेमच्या घरी गेला आणि त्याच्यासोबत पुन्हा वाद घातला. त्याचवेळी निखिलने चाकू काढला आणि सपासप प्रेमच्या उजव्या दंडावर, कुशीत, छातीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर निखिल पसार झाला आहे. या प्रकरणी प्रेमच्या तक्रारीवरून रविवारी उशिरा रात्री निखिल विरुध्द घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजापेठ पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...