आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेळघाटातील हरिसाल येथील आरएफओ ३४ वर्षीय दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी (दि. २५) सायंकाळी हरि साल येथील शासकीय निवासस्थानी बंदूकीतून छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून, डीसीएफ विनोद शिवकुमारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळेच ग्रामीण पोलिसांनी डीसीएफ शिव कुमारला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही तक्रार केली होती मात्र, रेड्डींनी कारवाई केली नाही. त्यामुळे रेड्डींवरही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २६) दिवसभर दीपाली चव्हाण यांच्या संतप्त नातेवाइकांनी आक्रोश करुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली नव्हती. माझ्या मुलीचा जीव गेला आहे. त्यामुळे डीसीएफ शिव कुमारला माझ्या डोळ्यादेखत फासावर लटकवा, असा टाहो दीपाली यांच्या आईने फोडला होता. दीपाली यांची आई, पती व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेेही डोळे पाणावले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता दीपालीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
आरएफओ दीपाली जनार्दन चव्हाण (३४) यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पतीला फोन करुन तुम्ही तत्काळ घरी पोहोचा, मला तुम्हाला शेवटचे पहायचे आहे, मला जगायचे नाही, असे म्हणून कॉल कट केला. तसेच आईला सुद्धा दीपाली यांनी फोन केला. अचानक फोेन कट झाल्यामुळे दीपाली यांचे पती राजेश मोहीते यांनी तत्काळ हरिसाल येथील वनमजूर संजू व रोषण मानके यांना फोन करुन दीपाली यांना पाहण्यास सांगितले. हे दोघे गेले असता घराचे दार बंद होते. त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले, त्यावेळी त्यांना घरातून गनपावडरचा (गोळी झाडल्यानंतर येणारा वास) वास आला. त्यामुळे त्यांना शंका आली व त्यांनी इतर वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आतमध्ये जाऊन पाहिले असता दीपाली चव्हाण यांच्या बाजूने पिस्तुल पडून होेते.
त्यांनी छातीवर गोळी झाडून घेतली होती. त्या रक्तबंबाळ अवस्थेत होत्या. ही माहिती धारणी पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळावर चिठ्ठी सापडली. त्यामध्ये डीसीएफ विनोद शिवकुमार यांच्या मानसिक छळाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे लिहिले होते. या प्रकरणी पोलिसांनी शिवकुमारवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावरुन शिव कुमारला अटक केली. दीपाली यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी इर्विनच्या शवविच्छेदन गृहात ठेवले होते. सकाळपासून दीपाली यांचे नातेवाईक तसेच समाजबांधव या ठिकाणी पोहोचले होते. तसेच भाजपचे पदाधिकारी सुद्धा आलेे होते. नातेवाइकांसह सर्वांनीच अप्पर प्रधान वनसंरक्षक रेड्डींवर शिवकुमारला पाठबळ दिल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याच मागणीसाठी नातेवाइकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिवसभर पोलिसांसोबत चर्चा केली. याचदरम्यान दीपाली यांच्या आई व इतर नातेवाइकांनी आक्रोश केला.
शिवकुमार यांच्या छळामुळे झालेली हत्या: दीपालीची आत्महत्या नसून, शिवकुमार यांच्या छळामुळे झालेली ही हत्या आहे, त्यामुळे शिवकुमारला माझ्या डोळ्या देखत फासावर लटकवा किंवा माझ्या ताब्यात द्या, मी त्याला फासावर लटकवते, असे दीपाली यांच्या आई अश्रू ढासळत बोलत होत्या. त्यांचा हा आक्रोश पाहून उपस्थितांच्या पापण्या ओलावल्या होत्या. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिस आणि नातेवाइकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, मागणी पूर्ण होईस्तोवर शवविच्छेदन करणार किंवा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांची होती. यावेळी पोलिस उपायुक्त विक्रम साळी, कोतवालीचे ठाणेदार राहुल आठवले, राजापेठ ठाणेदार मनीष ठाकरे, गाडगेनगर ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यासह ग्रामीण पोलिस दलाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी पोहोचले होते. दुपारच्या वेळी नातेवाइकांसोबत चर्चा करण्यासाठी एसपी डॉ. हरिबालाजीसुद्धा पोहोचले होते. दरम्यान सुमारे आठ ते नऊ तासानंतर या विषयावर तोडगा निघाला होता.
किमान माझ्या मृत्यूनंतर तरी रोखलेले वेतन द्या:डीसीएफ शिवकुमार यांनी माझ्या वैद्यकीय रजा काळातील वेतन अडवून ठेवले होते, त्यामुळे रेड्डींकडे मागणी करुन ती रजा मंजूर करण्याची मागणी केली होती मात्र, त्यावेळी रेड्डींनीही ती मागणी मंजूर केली नव्हती. किमान माझ्या मृत्यूनंतर ही रक्कम कुटुंबियांना देण्यात यावी, अशी मागणी मृत्यूपूर्वी चिठ्ठी द्वारे दीपाली यांनी रेड्डी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, दीपाली चव्हाण यांचे मुळ गाव कोकणातील दापोली मात्र त्यांचे वडील जनार्दन चव्हाण हे कृषी खात्यात नोकरीला असल्यामुळे ते सातारा जिल्ह्यातील कराडला स्थायिक झाले. दीपाली या अभ्यासात अतिशय हुशार होत्या.
हा तर अमानुषपणाचा कळसच : खासदार नवनीत राणा
एका निर्ढावलेल्या अधिकाऱ्याच्या अमानुषपणाचा कळस झाल्यामुळेच आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या सारख्या कर्तबगार महिला कर्मचाऱ्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. दीपाली यांच्या आत्महत्येसाठी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमारसोबतच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डाॅ. रेड्डीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी वेळीच या प्रकाराची गंभीर दखल घेतली असती िकंवा दीपाली यांची बदली केली असती तर अशी दु:खद घटना घडली नसती. या प्रकरणी दीपाली यांना न्याय िमळवून देण्यात यावा, यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र आलेच पाहिजे.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी : पालकमंत्री
आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी िदली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती कार्यान्वित असणे आवश्यक असून, तसे नसल्यास कार्यालय प्रमुखावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
पतीची रेड्डी विरुद्ध तक्रार; पोलिसांनी नोंद घेतल्यानंतर झाले शवविच्छेदन
आरएफओ दीपाली यांचे पती राजेश मोहीते यांनी शुक्रवारी पोलिसांकडे अप्पर मुख्य वनपरिक्षेत्र अधिकारी रेड्डी यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. डीसीएफ शिवकुमार यांच्यापासून असलेला त्रास असह्य हाेत आहे, अशी तक्रार यापूर्वी दीपाली यांनी रेड्डी यांच्याकडे केली होती. मात्र रेड्डी यांनीसुद्धा शिव कुमारवर कारवाई केली नाही. त्यामुळे रेड्डी सुद्धा जबाबदार असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी तक्रार दिली. धारणी पोलिसांनी तशी नोंद स्टेशन डायरीमध्ये घेतली. तसेच सखोल चौकशीअंती कार्यवाहीची तजवीज ठेवल्याची नोंद घेतली असून, तशी माहिती दीपाली यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता दीपाली यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी नातेवाइकांनी परवानगी दिली.
गर्भवती असताना कच्च्या रस्त्यावर फिरवल्याने झाला होता गर्भपात!
ऑक्टोबर २०२० मध्ये डीसीएफ शिवकुमार व एसीएफ यांनी माकुर येथे सलग तीन दिवस कच्च्या रस्त्यावरुन फिरवले. वास्तविकता गर्भवती असताना तसे फिरवणे धोकादायक होते. या तीन दिवसांच्या त्रासामुळे गर्भपात झाला. गर्भपात होऊनही डीसीएफ शिवकुमारने मला सुटी दिली नव्हती, असा उल्लेख आरएफओ दीपाली चव्हाण यांनी चिठ्ठीत केला आहे. तसेच डीसीएफ रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात, अश्लील भाषेत बोलतात. या संदर्भात रेड्डींकडे दीपाली यांनी तक्रार केली होती मात्र रेंड्डींनी या तक्रारीची दखल घेतली नव्हती. असाही उल्लेख मृत्यूपूर्वी चिठ्ठीत करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.