आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक उद्योजकांना आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविण्याचा एक भाग म्हणून राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या कौशल्य विद्यापीठातर्फे येथील आयटीआयमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स’ हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. अशी माहिती कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी आज, गुरुवारी दिली. आगामी शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. असे देखील त्यांनी सांगितले.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केले जाणार आहे. त्यासाठीची जागा पाहण्यासाठी डॉ. पालकर येथे आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील अभ्यासक्रमाची घोषणा केली. त्या म्हणाल्या, प्रस्तावित अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. हा अभ्यासक्रम चार वर्षीय कालखंडाचा असेल. त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (एमएच-सीइटी) घेतली जाईल, अशी पुरक माहितीही त्यांनी दिली.
उपकेंद्राच्या अनुषंगाने डॉ. पालकर यांनी परिसराची पाहणी केली. प्रारंभी त्यांनी स्थानिक उद्योजकांशीही चर्चा केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की, उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इनोवेशन रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमात 40 टक्के अभ्यासवर्ग आणि 60 टक्के ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ देण्यात येणार असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उत्तम प्रशिक्षित व अनुभवसिद्ध मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
केवळ यांत्रिकच नव्हे, तर संगणकीय व इतर कौशल्यांचे मिश्रण असलेल्या मेकॅट्रॉनिक्स शाखेतील कुशल मनुष्यबळाची गरज अमरावतीसारख्या शहरांतही आहे. कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांतून असे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. कौशल्य पुन:प्रशिक्षणाच्या संधी देणारे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. इनोवेशन हबद्वारे संशोधनाला चालना देण्यात येणार आहे.
उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या कौशल्यांचा शोध घेणे, जागतिक पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध व त्यानुसार कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था करणे हे आव्हान विद्यापीठापुढे आहे. त्यानुसार राज्यात सहा महसुली विभागात उपकेंद्रे सुरू करणे, उद्योगांशी चर्चा व त्यानुसार नव्या अभ्यासक्रमांची रचना, विद्यापीठासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती आदी प्रक्रिया वेगाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक रवींद्र लोखंडे, प्राचार्य संजय बोरकर, उपप्राचार्य राजेश चुलट, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, विद्यापीठाचे प्रवक्ते अजिंक्य भांबेरे, निदेशक रवि दांडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.