आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांसाठी मारक असलेले तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत वर्षभर केल्या गेलेल्या ऐतिहासिक आंदोलनाची आठवण तसेच शेतमालाच्या किमान आधारभूत मूल्याबाबत (एमएसपी) दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न केल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी-शेतमजुरांच्या विविध संघटना आगामी ३१ जुलैला इर्विन चौकात निदर्शने करणार आहेत.
सोमवारी झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नमूना चौथी गल्ली स्थित भाकपच्या कार्यालयात दुपारी ही बैठक झाली. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार देशभर अशी निदर्शने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमरावतीतही ३१ जुलैला सकाळी ११ वाजेपासून निदर्शने करून केंद्र सरकारचा खरा चेहरा उघड केला जाईल. तीन काळे कायदे मागे घेताना एमएसपीची पूरक मागणीही लवकरच विचारात घेतली जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतर कधीही या विषयावर बैठक बोलावली नाही.
त्यामुळे एका अर्थाने केंद्र सरकारने वादाखिलाफीच केली, असा किसान समन्वय समितीचा आरोप आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध आयोजित निदर्शनांमध्ये शेतकरी-शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन किसान समन्वय समितीतर्फे करण्यात आले. बैठकीला भाकपच्या नेतृत्वातील म. रा. किसान सभेचे प्रदेश चिटणीस अशोक सोनारकर, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे व इतर संघटनांचे पदाधिकारी सतीश चौधरी, महेश देशमुख, वसंत पाटील, किरण गुडधे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.