आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावाधान! डेंग्यूचा धोका:जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह तर 224 जण संशयित; संततधार पावसामुळे रुग्णसंख्येत वाढ

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे डासांची उत्पत्तीही वाढत असून परिणामी डेंग्यूंच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. 224 संशयित रुग्णांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

ऑगस्ट महिन्याआधी डेंग्यू रुग्णांची संख्या ही फारच कमी होती. परंतु, दोन महिन्यातील पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे तो स्थिरावण्याइतपत चिंताजनक स्थिती सध्या निर्माण झाली आहे. ते बघता महानगर पालिकेसह जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह समजते तात्काळ

जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती तालुक्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. मनपा क्षेत्रात आतापर्यंत 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता जानेवारी ते 12 सप्टेंबर. 2022 पर्यंत 224 संशयितांची चाचणी केल्यानंतर डेंग्यूचे 49 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विशेष बाब अशी की, यंदा डेंग्यूचे निदान करणारी प्रयोगशाळा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये​​​​​​​ सुरू झाल्यामुळे दिवसभरात रुग्ण पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह असा अहवाल मिळतो. याआधी नमुने यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठावावे लागायचे. त्यामुळे अहवाल येण्यास उशीर व्हायचा. परंतु, आता तत्काळ अहवाल मिळत आहे.

आरोग्य यंत्रणा मिशन मोडवर

डेंग्यू हातपाय पसारत असतानाच जिल्ह्यात चिकन गुनिया, मलेरिया, स्क्रब टायफस या आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. चिकन गुनियाचे 25, मलेरियाचे 42 आणि स्क्रब टायफसचे 6 रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. सध्या कोरोना लाट नियंत्रणात असताना इतर साथरोग धुमाकूळ घालत आहेत. गेल्या वर्षी कोरोना लाटेतच डेंग्यूचे एकूण 302 रुग्ण आढळले होते. यंदा डेंग्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी आता सतत सार्वत्रिक पाऊस सुरू झाल्यामुळे ते वाढायला लागले आहे. ते बघता आरोग्य यंत्रणा मिशन मोडवर कामाला लागली आहे.

सॅनिफॉम फवारणी करण्यात आली सुरू

एडीस इजिप्ती नावाच्या डासांपासून डेंग्यू होतो. हे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. तसेच या डासांच्या अळ्या या स्वच्छ पाण्यात वाढतात. त्यामुळे घर व परिसरात स्वच्छ पाणी साठून राहता कामा नये, अशी मोहिमच राबविण्यात आली. तसेच जिल्ह्यातही स्वच्छ पाण्याची भांडी रिकामी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. पिण्याच्या पाण्याची भांडी सतत धुणे, टाक्या, टब रिकामे करणे, आरोग्य शिक्षणासह जनजागृतीवर भर देण्यात आला. आता सर्वत्र सॅनिफॉम फवारणी सुरू करण्यात आली आहे.

ही आहेत लक्षणे

ताप येणे, अचानक ताप वाढणे, डोके दुखणे, हातपायात वेदना होणे, हाडे दुखणे, स्नायू दुखणे, वांत्या होणे, डोळे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत.

बातम्या आणखी आहेत...