आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:सततच्या पावसामुळे जिल्हाभरात डेंग्यूचा फैलाव; 49 पॉझिटिव्ह ; काळजी घेण्याची आवश्यकता

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या १५ दिवसांतील सततच्या पावसामुळे आतापर्यंत अल्प प्रमाणात असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आता झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. २२४ संशयित रुग्णांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात ४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ऑगस्ट महिन्याआधी डेंग्यू रुग्णांची संख्या ही फारच कमी होती. परंतु, दोन महिन्यातील पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे तो स्थिरावण्याइतपत चिंताजनक स्थिती सध्या निर्माण झाली आहे. ते बघता महानगर पालिकेसह जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती तालुक्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. मनपा क्षेत्रात आतापर्यंत ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता जानेवारी ते १२ सप्टें. २०२२ पर्यंत २२४ संशयितांची चाचणी केल्यानंतर डेंग्यूचे ४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विशेष बाब अशी की, यंदा डेंग्यूचे निदान करणारी प्रयोगशाळा सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये सुरू झाल्यामुळे दिवसभरात रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह असा अहवाल मिळतो. याआधी नमुने यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागायचे. त्यामुळे अहवाल येण्यास उशीर व्हायचा. परंतु, आता तत्काळ अहवाल मिळत आहे.

डेंग्यू हातपाय पसरत असतानाच जिल्ह्यात चिकन गुनिया, मलेरिया, स्क्रब टायफस या आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. चिकुन गुनियाचे २५, मलेरियाचे ४२ आणि स्क्रब टायफसचे ६ रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. सध्या कोरोना लाट नियंत्रणात असताना इतर साथरोग धुमाकूळ घालत आहेत. गेल्या वर्षी कोरोना लाटेतच डेंग्यूचे एकूण ३०२ रुग्ण आढळले होते. यंदा डेंग्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी आता सतत सार्वत्रिक पाऊस सुरू झाल्यामुळे ते वाढायला लागले आहे. ते बघता आरोग्य यंत्रणा मिशन मोडवर कामाला लागली आहे.

एडीस इजिप्ती नावाच्या डासांपासून डेंग्यू होतो. हे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. तसेच या डासांच्या अळ्या या स्वच्छ पाण्यात वाढतात. त्यामुळे घर व परिसरात स्वच्छ पाणी साठून राहता कामा नये, अशी मोहिमच राबवण्यात आली. तसेच जिल्ह्यातही स्वच्छ पाण्याची भांडी रिकामी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. पिण्याच्या पाण्याची भांडी सतत धुणे, टाक्या, टब रिकामे करणे, आरोग्य शिक्षणासह जनजागृतीवर भर देण्यात आला. आता सर्वत्र सॅनिफाॅग फवारणी सुरू करण्यात आली आहे. ताप येणे, अचानक ताप वाढणे, डोके दुखणे, हात-पायात वेदना होणे, हाडे दुखणे, स्नायू दुखणे, उलट्या होणे, डोळे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत.

डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे रुग्ण हे आतापर्यंत मर्यादित प्रमाणात होते. परंतु, आता या आजाराच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पावसाळा संपत आल्यामुळे लवकरच डेंग्यू नियंत्रणात येऊ शकतो. - डाॅ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी

प्रतिबंधक उपाययोजना
किटक निर्मुलन सर्व्हेक्षण, ताप सर्वेक्षण, स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडण्याची कारवाई, संशयित आढळणाऱ्या परिसरात जंतूनाशक फवारणी, अळीनाशक सॅनिफॉगची फवारणी, आरोग्य शिक्षण, जनजागृती, आशा सेविकांद्वारे घरोघर पाण्याची भांडी रिकामी करण्यासाठी मोहिम राबविणे, एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन करणे, उगाच ज्या भांड्यात पाणी साठून राहते अशी भांडी रिकामी करणे, रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करण्यासारख्या उपाययोजना आरोग्य विभागाद्वारे केल्या जात असल्याची माहिती, आरोग्य अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...