आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजकल्याण विभागाच्या विभागीय कला व क्रीडा स्पर्धा वाशीमच्या जिल्हा क्रीडा संकुलात २८ जानेवारी रोजी पार पडल्या. अमरावती विभागाचे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, अमरावती समाज कल्याण आयुक्त माया केदार, बुलडाणा समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, अकोलाचे समाज कल्याण आयुक्त राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक सहायक आयुक्त मारोती वाठ होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सुरकुंडी येथील शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक ए. आर. भगत यांनी कला व क्रीडा अविष्कार स्पर्धाबाबत प्रास्ताविक केले. श्री. वारे म्हणाले की, अमरावती समाज कल्याण विभागांतर्गत २७ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा आहेत.
या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागांतर्गत नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहे. त्याअंतर्गत समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडा नैपुण्य विकसीत होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार स्पर्धेचे आयोजन विभागाच्या वतीने प्रथमच करण्यात आल्याचे सांगितले. कला व क्रीडा स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी भूमिका-अभिनय व लोकनृत्य स्पर्धा तसेच धावण्याची स्पर्धा, लांब उडी, थाळीफेक, रस्सीखेच व खो-खो या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील सर्व निवासी शाळांमधून जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजयी स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. समाज कल्याणचे आयुक्त नारनवरे यांच्या संकल्पनेतून विभागात नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिने त्यांच्या शैक्षणिक विकासासोबत शारिरीक व मानसिक विकास साध्य करण्याकरता यावर्षी प्रथमच कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये जवळपास ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे श्री. वारे यांनी सांगितले. विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले. कार्यक्रमाकरीता अमरावती विभागातील सर्व शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, प्रादेशिक उपाआयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी वर्ग, शासकीय वसतिगृहातील गृहपाल, अमरावती विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी, ब्रिक्स प्रा. लि. व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. हिवरे यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.