आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळं जमलं, पण मल्लखांब जमला नाही:उपमुख्यमंत्री फडणवीस रमले बालपणीच्या आठवणीत; एचव्हीपीएमच्या क्रीडा विद्यापीठासाठी समिती

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा (एचव्हीपीएम) माजी विद्यार्थी आहे. लहान असताना उन्हाळी सुट्यांमध्ये मी व्यायाम प्रवेश प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे पूर्ण केला. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण केंद्रात मी पोहण्यास शिकलो. लाठी-काठी, तसेच इतर व्यायाम प्रकारही शिकलो. केवळ मला मल्लखांब शेवटपर्यंत जमले नाही हे सांगताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या बालपणींच्या आठवणीत रमले.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एचव्हीपीएम परिसरातील मेजर ध्यानचंद इनडोअर स्टेडियमचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

ती तर माझ्या जिव्हाळ्याची संस्था

एचव्हीपीएममधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अमरावती शहर हे अंबादेवीचे मंदिर, इतर काही नामांकित व्यक्तींसह एचव्हीपीएमच्या नावाने ओखले जाते. ही माझ्या जिव्हाळ्याची संस्था आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने शहराच्या गौरवात भर घातली आहे. गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेचा मी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. या संस्थेच्या अनेक स्मृती मनात आहेत.

ध्यानचंद लढवय्ये

फडणवीस म्हणाले, अतिशय विपरीत परिस्थितीत काम करून मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला उंचीवर नेऊन ठेवले. जिंकण्यासाठी मनाची मजबुती हवी. हा गुण खेळातूनच शिकता येतो. ध्यानचंद यांनी नेहमीच हाॅकीत विजय मिळविले. त्यांच्या नावे संस्थेत इनडोअर स्टेडियम निर्माण झाल्याचा आनंद होत आहे. स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर स्टेडियममध्ये विद्यार्थी खेळाडूंकडून तायक्वांदो, बॉक्सिंग व कबड्डीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले.

क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे (एचव्हीपीएम) क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठित करून निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

खा. डाॅ. अनिल बोंडे यांनी एचव्हीपीएम येथे क्रीडा विद्यापीठ व्हावे, असे नुकतेच म्हटले होते. त्याची आठवण एचव्हीपीएमचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी प्रास्ताविकात करून दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.

मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खा.रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रताप अडसड, निवेदिता चौधरी, एचव्हीपीएमचे प्रधान सचिव पद्मश्री वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप मालखेडे, एचव्हीपीएमचे युनेस्कोतील प्रतिनिधी प्रणव चेंडके, उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, कुस्ती विभाग प्रमुख डाॅ. संजय तीरथकर व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेचा इतिहास गौरवशाली

एचव्हीपीएम या गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेने क्रीडा उपक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही सातत्याने राबविले. खेळ व व्यायाम एवढेच मर्यादित क्षेत्र न ठेवता मानवतेचा विचार करणारी ही संस्था आहे. संस्थेचे क्रीडा विद्यापीठ झाले पाहिजे, अशी मागणी आहे. त्यामुळे संस्थेचे विद्यापीठ करण्याबाबत लवकरच एक समिती स्थापन करून सकारात्मक कारवाई करू. त्याचप्रमाणे, संस्थेचे वसतिगृह तसेच इतर उपक्रमांसाठी निश्चित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सामाजिक उपक्रमातही अग्रेसर

मंडळाने 108 वर्षांच्या इतिहासात अगदी स्थापनेपासून क्रीडा उपक्रमांबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर राहून अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले. दंगली रोखण्यासाठी व सामाजिक एकोपा राखण्यासाठी कार्यक्रम, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागृती अभियान तसेच कोविड साथीच्या काळात महत्वपूर्ण उपक्रम येथील स्वयंसेवकांनी राबवले. संस्थेत भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थी शिकत आहेत.

संस्था संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करीत असून एका अर्थाने हा 'मिनी भारत' आहे. या 'मिनी भारता'तर्फे आपले स्वागत करत असल्याचे पद्मश्री वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगितले. संस्थेतर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सचिव डाॅ. माधुरी चेंडके यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...