आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस बंगला शौकिनांसाठी ठरतोय पोषक:अचलपूरच्या एसडीपीओंचा बंगल्यात दारू, गांजाची मैफिल अन् अनैतिक कामासाठी वापर

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूरच्या एसडीपीओंचा बेवारस बंगला शौकिनांसाठी ठरतोय पोषक ठरत आहे. दारू, गांजाची मैफिल अन् अनैतिक कामासाठी या बंगल्याचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

परतवाडा-अंजनगाव महामार्गालगत असणाऱ्या अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे निवासस्थान म्हणून शिवनेरी हा बंगला ओळखल्या जातो. मात्र या बंगल्याची दुरावस्था झाल्याने तो राहण्यायोग्य नसल्याने अचलपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिल्यानंतर तत्कालिन उपविभागीय अधिकारी पी. जे. अबदागिरे यांच्या कार्यकाळात पोलिस प्रशासनाने खाली करून घेतला.

त्या अबदागिरे भाड्याच्या घरात रहायला गेले. तेव्हापासून हा बंगला बेवारस आहे. या इंग्रजकालीन बंगल्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून चोरट्यांनी कुठलीच भीती न बाळगता या बंगल्यातील साहित्य लंपास करणे सुरू केले आहे. या बंगल्याच्या छतावरील टिन, खिडक्या व इतर साहित्य चोरीला जात आहे. दिवस असो की रात्र या बंगल्याचा वापर आंबटशौकीन अन्य कामांसाठी करीत आहे.

या बंगल्याच्या परिसरात दारू, गांजा, सिगारेट आदींचा सर्रास वापर केल्या जात असल्याचे चित्र येथे पडलेल्या साहित्यावरून दिसून येते. हा बंगला तोडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला होता. मात्र अजुनपर्यंत त्या कामाला गती आली नाही. अचलपूर येथील साबांविने या बंगल्याबाबत प्रशासकीय स्तरावरील माहिती पोलिस विभागाला दिली आहे, तर पोलिस प्रशासनाकडून वरिष्ठस्तरावर नव्या इमारतीबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत असलेल्या या बंगल्याच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बंगल्याचा गैरमार्गासाठी होत असलेला वापर भविष्यात गुन्हेगारीला पोषक ठरू शकतो. त्यामुळे तत्काळ योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

जबाबदारी आमची नाही

अचलपूर साबांवि, उपविभागीय अधिकारी अभयकुमार बारब्दे म्हणाले की, या बंगल्याबाबत पोलिस प्रशासनाला माहिती देवून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दुरूस्ती किंवा नव्या बांधकामाबाबत निधी प्राप्त झाल्यास योग्य त्या उपाययोजना करता येईल. या बंगल्याची चौकीदारी करण्याची जबाबदारी आमची नाही.

योग्य त्या उपाययोजना करू

अचलपूर एसडीपीओ अतुल नवघिरे म्हणाले की, परतवाडा येथील हा बंगला सध्या शिकस्त झाल्याने दुरूस्तीचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आहे. या बंगल्या संदर्भातील योग्य ती माहिती घेवून निश्चितच उपाययोजना केल्या जातील. मी सुध्दा भाड्याच्याच घरात राहत आहे.

बातम्या आणखी आहेत...