आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाचा अभाव:शहानूर धरणामध्ये मुबलक साठा तरी अंजनगाववासीयांना पाणीटंचाईची झळ

अंजनगाव सुर्जी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मजीप्रा’कडून पुरवठा कमी होत असल्याने पाणीटंचाईची समस्या

शहानूर धरणात मुबलक पाणी असतानादेखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अपुऱ्या जल व्यवस्थापनामुळे शहरातील काही भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. अशा परिस्थितीत उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जुन्या टाकी वरून होणारा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने वर्षभरापासून विस्तारीत पाण्याची टाकी बांधून तयार आहे, परंतु अद्यापही तिच्या कनेक्टिव्हिटीचे काम झाले नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी स्थानिक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.

शहराचा विस्तार होत असून, लोकसंख्यादेखील वाढत आहे. ही बाब लक्षात घेता विस्तारीत पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने दोन वर्षांपूर्वी नगर परिषदेला मंजूर झालेल्या नगरोत्थाच्या निधीतून शहरात दोन पाण्याच्या टाक्या व काही भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्या अंतर्गत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली, परंतु उर्वरित निधी अडकला असल्याने टाकीचे काम पूर्ण झाले असताना त्याच्या कनेक्टिव्हिटीचे काम वर्षभरापासून बंद आहे.

आमदार वानखडेंनी निधीही उपलब्ध करून दिला
उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईचा वेध घेता माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी आमदार बळवंत वानखडे यांना उर्वरित निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करण्याची मागणी केली. आमदारांनी निधीही उपलब्ध करून दिला. परंतु अमरावती नगर प्रशासन विभागात निधी वर्ग करण्याच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तो गोठवण्यात आला होता.

मात्र, नंतर तो मिळाला असला, तरी मधला महिनाभराचा काळ व्यर्थ गेल्याने कनेक्टिव्हिटीचे काम रखडले. परिणामी नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

१० लाख लिटरच्या टाकीवर ७ हजार नागरिकांची मदार
शहरात असलेल्या ७ हजार लोकांच्या पाणीपुरवठ्यासाठी केवळ १० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून, त्यावरून झोननिहाय पाणीपुरवठा केला जात असताना सुद्धा ती क्षमता कमी पडत आहे पावसाळा व हिवाळा या काळात कमी पाणी लागत असल्याने तो काळ निघून गेला, परंतु आता उन्हाळ्याच्या काळात पाण्याचा वापर वाढत असल्याने मुळात पाणीपुरवठा कमी पडत आहे. परिणामी ही टंचाई निर्माण झाली आहे, असे सांगण्यात येते.

लवकरच सुरू होईल पाण्याची कनेक्टिव्हिटी
पाण्याच्या टाकीचे ९० टक्के काम झाले असून उर्वरित काम निधीअभावी होणे बाकी आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत उर्वरित काम पूर्ण होऊन पाण्याची कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात येईल. नागरिकांनी सहकार्य करावे.
प्रतिक वाटाणे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न. प. अंजनगाव सुर्जी.

बातम्या आणखी आहेत...