आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे नुकसान:ग्रामस्थांच्या विरोधानंतरही प्रशासनाने सांडवा फोडला; 20% पाणी सोडले; पाचशे फूट रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या बचावासाठी निर्णय

धारूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस बंदोबस्तात आरणवाडी प्रकल्पाचा सांडवा फोडून पाणी सोडले. या वेळी ग्रामस्थही दाखल झाले होते.

गेल्या दाेन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विरोधानंतर चर्चेत आलेल्या आरणवाडी प्रकल्पाचा सांडवा अखेर अधिकाऱ्यांनी फोडलाच. १५ वर्षांनंतर प्रकल्पात साठलेले २० टक्के पाणी सोडून देण्यात आले अाहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत हित पुढे ठेवून हा निर्णय घेतला. परिणामी शेतकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी याप्रकरणी थेट मंत्र्यांकडे तक्रार करत आपल्या भावना मांडल्या. धारूर-खामगाव रस्त्याला जोडणाऱ्या पाचशे फूट रस्त्याच्या निकृष्ट कामाचा बचाव करण्यासाठी अधिकाऱ्यांनी १५ वर्षानंतर उभारलेल्या तलावाचा सांडवा फोडण्याचा निर्णय घेतला होता.

याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत होती. शेतकऱ्यांनी एकत्र येत या निर्णयाला विरोध केला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी शनिवारी माघार घेत सांडवा फोडण्याचे टाळले. परंतु, रविवारी जलसंधारण विभागाचे अधीक्षक बी. एम. चिश्ती आणि कार्यकारी अभियंता यू. व्ही. वानखेडे यांनी रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तलावाच्या स्थळी पोलिस बंदोबस्तासह दाखल झाले. यावेळी ग्रामस्थही हजर होते. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन देत एकदा पाणी पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा पाणी भरून देण्याचे आश्वासन दिले. याच आधारावर रविवारी सकाळी धारूर येथील उपअभियंता व्ही. बी. हत्ते यांच्या उपस्थितीत बंधारा फोडण्यात आला.

पाच गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान केले
पाचही गावांतील शेतकऱ्यांनी विरोध करूनही प्रशासनाने आरणवाडी साठवण तलावाचा बंधारा फोडला. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी रस्ते कामाचे अंदाजपत्रक तयार करताना या बाबींचा विचार करण्याची गरज होती. हा अन्याय केला गेला. - सादेक इनामदार, सामाजिक कार्यकर्ते.

पुन्हा अडचणी, अशाने दुष्काळ कसा मिटेल?
जो प्रकल्प मंजूर होऊन १५ वर्षे लोटली त्याचे काम आज होऊन १०० टक्के पाणी प्रकल्पात साचल्याने आमची चिंता मिटली होती. परंतु हे पाणी सोडल्याने आता पुन्हा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशाने दुष्काळ कसा मिटेल? - सचिन शिंदे, शेतकरी, चोरंबा.

तहसीलदारांच्या पंचनाम्यास काही अर्थ?
धारूरच्या तहसीलदार वंदना शेडोळकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरणवाडी तलावास कसलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय, रस्ता काम निकृष्ट झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. परंतु, याउपरही सांडवा फोडल्याने तहसीलदारांच्या पंचनाम्यास काही अर्थ आहे का? असा सवाल निर्माण होत आहे.

मंत्री कडूंच्या सूचनेनंतर आहे त्या स्थितीत थांबवले काम
दुपारी १२ वाजता सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी तलावस्थळी धाव घेत मंत्री बच्चू कडू यांच्या कानी हा प्रकार घातला. मंत्री कडूंनी वानखेडेंना सूचना दिल्या. त्यानंतर सांडवा फोडल्याचे काम आहे त्या स्थितीत थांबवण्यात अाले. परंतु, तोपर्यंत २० टक्के पाणी जाईल, असे नियोजन प्रशासनाने केले होते. या सर्व प्रकाराने एका चुकीच्या रस्ते कामाला पाठीशी घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी आमचे नुकसान केल्याची भावना पाच गावांच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आरणवाडी प्रकल्प भरल्याने मिटला होता ‘सिंचनाचा प्रश्न’बातम्या आणखी आहेत...